Reservation lottery : जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाचे आरक्षण १३ ऑक्टाेबर २०२५ रोजी काढण्यात आले. या वेळी विविध पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या आरक्षण सोडतीमुळे अनेक दिग्गजांना आपल्या मतदारसंघावर पाणी सोडावे लागले असून, आता त्यांना दुसरा सोयीस्कर मतदारसंघ शोधावा लागणार आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षणामुळे दिग्गजांना फटका :पातुर पंचायत समितीतील १२ पैकी सहा गण महिलांसाठी राखीव!
संजय गोतरकर
पातुर : जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाचे आरक्षण १३ ऑक्टाेबर २०२५ रोजी काढण्यात आले. या वेळी विविध पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या आरक्षण सोडतीमुळे अनेक दिग्गजांना आपल्या मतदारसंघावर पाणी सोडावे लागले असून, आता त्यांना दुसरा सोयीस्कर मतदारसंघ शोधावा लागणार आहे.
या सोडतीनंतर तालुक्यात “कही खुशी, कही गम” असेच चित्र पाहायला मिळाले. गुलाबी थंडीच्या आगमनासोबतच राजकीय डावपेचांचे तापमान मात्र चांगलेच वाढले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण आता रंगत जाण्याची चिन्हे दिसत आहेत.
आरक्षण सोडतीची माहिती
पातुर पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत नवीन तहसील कार्यालयाच्या इमारतीत दुपारी तीन वाजता पार पडली. अध्यक्षस्थानी बाळापूरचे उपविभागीय अधिकारी निखिल खेमनार होते. प्रमुख उपस्थितीत पातुरचे तहसीलदार डॉ. राहुल वानखेडे, नायब तहसीलदार अजय तेलगोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
आरक्षणाचे तपशील पुढीलप्रमाणे :
-
दिग्रस बु. – अनुसूचित जाती (महिला)
-
खानापूर – अनुसूचित जाती
-
चोंडी – अनुसूचित जमाती (महिला)
-
शिरला – ओबीसी नामनिर्देशित प्रवर्ग (महिला)
-
बाभुळगाव – ओबीसी नामनिर्देशित प्रवर्ग (महिला)
-
विवरा – सर्वसाधारण
-
सस्ती – सर्वसाधारण (महिला)
-
मळसुर – सर्वसाधारण (महिला)
-
पिंपळखुटा – सर्वसाधारण
-
उमरा – सर्वसाधारण
-
आलेगाव – ओबीसी नामनिर्देशित प्रवर्ग
-
सावरगाव – सर्वसाधारण
जिल्हा परिषद गटांमध्ये शिरला (अनुसूचित जाती महिला), विवरा (खुला प्रवर्ग), सस्ती (ओबीसी नामाप्र), आलेगाव (खुला प्रवर्ग महिला), चोंडी (अनुसूचित जमाती) आणि पिंपळखुटा (ओबीसी नामाप्र) यांचा समावेश आहे.
आरक्षणामुळे राजकीय गणिते बदलली
पातुर तालुक्यात सहा जिल्हा परिषद गट आणि १२ पंचायत समिती गण आहेत. या सोडतीकडे तालुक्यातील सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिकांचे लक्ष लागले होते.
माजी उपाध्यक्षांचा शिरला जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती महिला प्रवर्गात गेल्याने त्यांना विवरा किंवा इतर गटातून उमेदवारीचा विचार करावा लागणार आहे. तर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षांचा चोंडी गट अनुसूचित जमाती प्रवर्गात गेल्याने त्यांनाही नवीन मतदारसंघ शोधावा लागेल.
तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांपैकी दोन गट — शिरला (अनुसूचित जाती महिला) आणि आलेगाव (खुला प्रवर्ग महिला) — महिलांसाठी राखीव ठरले आहेत.
तर पंचायत समितीच्या १२ गणांपैकी सहा गण महिलांसाठी राखीव आहेत :
शिरला (ओबीसी महिला), दिग्रस (अनुसूचित जाती महिला), चोंडी (अनुसूचित जमाती महिला), बाभुळगाव (ओबीसी महिला), सस्ती (सर्वसाधारण महिला) आणि मळसुर (सर्वसाधारण महिला).
राजकीय हालचालींना वेग
पातुर पंचायत समितीचे विद्यमान सभापतींच्या खानापूर गणचे अनुसूचित जातीसाठी आरक्षण लागल्याने त्यांनाही दुसऱ्या गणाचा शोध घ्यावा लागणार आहे.
एकूणच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षणामुळे अनेक दिग्गजांना फटका बसला असून काहींच्या चेहऱ्यावर हसू तर काहींच्या चेहऱ्यावर निराशा दिसून आली.
गुलाबी थंडीची सुरुवात होताच निवडणुकीचे तापमान चांगलेच वाढले आहे. भावी उमेदवार आता पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडे आपली उपस्थिती दाखवून तिकिट पक्के करण्याच्या प्रयत्नात आहेत.
आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमात अनेक संभाव्य उमेदवार नवीन शुभ्र खादी परिधान करून उपस्थित होते. सोडतीतील चिठ्ठ्या कुमारी आरवी आणि पूर्वी वानखेडे या छोट्या मुलींनी काढल्या. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांना चॉकलेट आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम शांततेत पार पडला. यासाठी मंडळ अधिकारी नरेंद्र बढे, पियुष गंगाखेडकर, सहाय्यक अनिल वानखेडे, नवीन कावल, गजानन वैराळे, मनोहर तेलगोटे आदींनी परिश्रम घेतले.

