High-Speed Bus Rampage : भरधाव बसने रस्त्याने कडेला उभ्या असलेलया तब्बल 10 ते 12 दुचाकींना चिरडल्याची धक्कादायक घटना चिखली ते बुलढाणा मार्गावर ७ मे रोजी दुपारी घडली. या अपघात सुदैवाने जीवीतहानी टळली असली तरी दुचाकींचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सुदैवाने जीवीत हानी टळली; पावसापासून वाचण्यासाठी थांबणे पडले महागात
चिखली : भरधाव बसने रस्त्याने कडेला उभ्या असलेलया तब्बल 10 ते 12 दुचाकींना चिरडल्याची धक्कादायक घटना चिखली ते बुलढाणा मार्गावर ७ मे रोजी दुपारी घडली. या अपघात सुदैवाने जीवीतहानी टळली असली तरी दुचाकींचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
चिखली तालुक्यात ७ मे रोजी दुपारी अचानकपणे जोरदार वारा आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. चिखली बुलढाणा मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांनी या मार्गावरील हातणी जवळील एका बंद पडलेल्या एका हॉटेलसमोर आपल्या दुचाक्या उभ्या करून शेडखाली आसरा घेतला होता. याच दरम्यान चिखलीहून बुलढाणाकडे जाणाऱ्या भुसावळ डेपोची एसटी बस क्रमांक एमएच २० बीएल २९९२ च्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव बस थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकींवर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की अनेक दुचाक्या एकमेकांवर चिरडल्या गेल्या. काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घटनास्थळी वाहनांचे तुकडे विखुरलेले दिसून आले. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. अपघाताचे नेमके कारण काय, तसेच एसटी चालकाचे नियंत्रण कसे सुटले याचा तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त वाहनधारकांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून नुकसानभरपाईची देण्याची मागणी होत आहे.
पावसामुळे बचाव करण्यासाठी घेतला आसरा
चिखली शहरासह परिसरात गुरूवारी दुपारी अचानक पाऊस झाला. या पावसापासून बचाव करण्यासाठी दुचाकीसवारांनी बंद पडलेल्या हॉटेलच्या शेडचा आसरा घेतला. मात्र, काही मिनीटातच भरधाव आलेल्या बसने दुचाकींना चिरडल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

