Shivaji Kayande : कंडारी (ता. साखरखेर्डा) येथील माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजी माधवराव कायंदे (वय ५७) यांचे आज सकाळी ८ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने कंडारीसह भंडारी, शेंदुर्जन, नागझरी आणि दरेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

साखरखेर्डा : कंडारी (ता. साखरखेर्डा) येथील माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजी माधवराव कायंदे (वय ५७) यांचे आज सकाळी ८ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने कंडारीसह भंडारी, शेंदुर्जन, नागझरी आणि दरेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
शिवाजी कायंदे हे साखरखेर्डा व शेंदुर्जन जिल्हा परिषद सर्कलमध्ये एक अभ्यासू व लोकाभिमुख कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. माजी जिल्हा परिषद सदस्य बंद्रीभाऊ वाघ यांचे ते भाचे होते. कंडारी गावचे सरपंच म्हणून काम करताना त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले.
विशेषतः शेंदुर्जन-जागदरी-कंडारी-भंडारी-खळेगाव या मार्गाच्या उभारणीसाठी त्यांनी पाठपुरावा केला. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना सोयीस्कर प्रवास मिळावा यासाठी एसटी बस सेवा सुरू व्हावी, यासाठी त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे वारंवार मागणी केली होती. बस सेवा सुरू न झाल्याने त्यांनी ५ मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. २ मे रोजी दुसरबीड येथे नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी गेले असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. तातडीने त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आज दुपारी ४ वाजता कंडारी येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, शिवराज कायंदे, माजी जि.प. सदस्य बंद्रीभाऊ वाघ, माजी सभापती रंगनाथ डोईफोडे, शिक्षक नेते अशोक उगलमुगले, अविनाश नागरे यांच्यासह अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली. शिवाजी कायंदे यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. त्यांचा अस्थी विसर्जन कार्यक्रम ६ मे रोजी सकाळी ९ वाजता कंडारी येथे होणार आहे. कायंदे यांच्या निधनाने केवळ एका कुटुंबावर नव्हे, तर संपूर्ण परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रावर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारा एक जिद्दी नेता हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

