Mahabreaking

[breaking_news]

Weekly Market—or a Dumping Ground :मूर्तिजापूरचा आठवडी बाजार की डंपिंग ग्राऊंड?घाणीच्या साम्राज्यात नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Weekly Market—or a Dumping Ground : शहरातील आठवडी बाजार हा नागरिकांच्या दैनंदिन गरजांचा केंद्रबिंदू मानला जातो. मात्र, सध्या या बाजाराची अवस्था पाहता तो बाजार कमी आणि डंपिंग ग्राऊंड जास्त वाटू लागला आहे. शुक्रवारी भरणाऱ्या या आठवडी बाजारात सर्वत्र पसरलेली घाण, कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधी यामुळे नागरिकांना अक्षरशः नाक मुठीत धरून वावरावे लागत आहे.

Weekly Market—or a Dumping Ground

नगर पालिका प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष : तातडीने उपाय योजना करण्याची मागणी

संजय उमक
मूर्तिजापूर : शहरातील आठवडी बाजार हा नागरिकांच्या दैनंदिन गरजांचा केंद्रबिंदू मानला जातो. मात्र, सध्या या बाजाराची अवस्था पाहता तो बाजार कमी आणि डंपिंग ग्राऊंड जास्त वाटू लागला आहे. शुक्रवारी भरणाऱ्या या आठवडी बाजारात सर्वत्र पसरलेली घाण, कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधी यामुळे नागरिकांना अक्षरशः नाक मुठीत धरून वावरावे लागत आहे.
नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बाजारपेठेत अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून, याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी सोईस्कर डोळेझाक केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे, मुख्याधिकारी स्वतः कार्यालयात नियमित हजर राहत नसल्याने प्रशासनातील शिस्त ढासळली आहे. याचा परिणाम थेट स्वच्छता व्यवस्थेवर होत असून, कर्मचाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही, अशी चर्चा शहरात रंगत आहे. लाखो रुपये खर्चून बाजारात दुकानदारांना बसण्यासाठी ओटे शेड तयार करण्यात आले असले तरी त्याचा व्यापारी वापर करीत नसल्याची बाब समोर आली आहे या आठवडी बाजारात पावसापासून बचावासाठी सुविधा व इतर नागरी सुविधा उपलब्ध नाहीत.
पूर्वी आठवडी बाजाराच्या आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी संपूर्ण परिसराची साफसफाई करण्यात येत असे. त्यामुळे शुक्रवारी बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांना व ग्राहकांना स्वच्छ वातावरण मिळत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ही पद्धत पूर्णपणे बंद पडल्याचे दिसून येत आहे. साफसफाईकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून, बाजार संपल्यानंतरही कचऱ्याचे ढीग तसेच पडून राहत आहेत. बाजार परिसरात भाजीपाला, फळे, मांस व इतर वस्तूंची विक्री होत असल्याने मोठ्या प्रमाणावर ओला व सुक्या कचऱ्याची निर्मिती होते. मात्र, हा कचरा वेळेत उचलला जात नसल्यामुळे त्यातून तीव्र दुर्गंधी पसरते. यामुळे केवळ बाजारपेठच नव्हे, तर आसपासच्या भागातील नागरिकही त्रस्त झाले आहेत. या घाणीमुळे माश्या, डास आणि भटक्या प्राण्यांचा त्रास वाढला असून, रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
फक्त बाजारापुरतेच नव्हे, तर संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येतात. मुख्य रस्ते, गल्लीबोळ आणि सार्वजनिक ठिकाणीही स्वच्छतेचा अभाव जाणवतो. यामुळे शहराच्या प्रतिमेलाही मोठा धक्का बसत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, नगर परिषद प्रशासनाने स्वच्छतेबाबत पूर्णपणे हात झटकले आहेत. अधिकारी आणि पदाधिकारी यांचेही याकडे दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट दिसून येते. केवळ कागदोपत्री स्वच्छतेचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत बिकट आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दुर्गंधी, कचरा आणि अस्वच्छतेमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असून, लहान मुले व वृद्ध यांच्यावर याचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.
मूर्तिजापूरच्या आठवडी बाजाराची ही दयनीय अवस्था पाहता, तात्काळ स्वच्छता मोहीम राबवून परिस्थिती नियंत्रणात आणणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, येत्या काळात ही समस्या अधिक गंभीर रूप धारण करेल आणि त्याची मोठी किंमत नागरिकांना मोजावी लागेल. प्रशासनाने वेळेत जागे होऊन ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top