Sanjay Tayde Guruji : भाऊसाहेब बिडकर विद्यालय, अनभोरा येथील कार्यरत शिक्षक संजय तायडे गुरुजी ३० एप्रिल रोजी वयोमानानुसार प्रदीर्घ व यशस्वी सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. यानिमित्त विद्यालयात आयोजित निरोप समारंभात भावनिक वातावरण निर्माण झाले.

बोरगाव मंजू : ज्ञानदानाची अखंड साधना करत तब्बल २६ वर्षे विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविणारे भाऊसाहेब बिडकर विद्यालय, अनभोरा येथील कार्यरत शिक्षक संजय तायडे गुरुजी ३० एप्रिल रोजी वयोमानानुसार प्रदीर्घ व यशस्वी सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. यानिमित्त विद्यालयात आयोजित निरोप समारंभात भावनिक वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे दुय्यम ठाणेदार मनोज उघडे होते. यावेळी पत्रकार संतोष चक्रनारायण, राजेश ढवळे गुरुजी, मुख्याध्यापक विजय इंगळे, ज्येष्ठ नागरिक राजाराम तायडे, सरिता जाधव, सविता ढाकरे, वर्षाबाई जाधव, चित्राबाई ढोरे, रोशन ठोकळ आदी मान्यवर उपस्थित होते.
संजय तायडे गुरुजी यांनी तब्बल २६ वर्षे शिक्षक म्हणून कार्य करत असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या अध्यापनशैलीतील शिस्त, समर्पण आणि विद्यार्थ्यांप्रती असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे त्यांनी सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले.
निरोप समारंभात मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी उपस्थित राहून त्यांचा सत्कार केला. यावेळी पालकांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली, तर विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना भावनिक क्षण अनुभवले.
आपल्या मनोगतात तायडे गुरुजी म्हणाले, “शिक्षक म्हणून सेवा करताना विद्यार्थ्यांचे यश हेच माझ्यासाठी सर्वात मोठे समाधान आहे.” त्यांनी सेवा काळात सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक मधुसूदन ढोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक विजय इंगळे यांनी केले. कार्यक्रमास किरण इंगळे, रामदास धुळे, संजय गावंडे, मनोज बाईस्कर, सुनील चव्हाण, प्रमोद म्हैसने यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

