Two-wheeler crashes :भरधाव मालवाहु ॲपेला दुचाकीने धडक दिल्याने दोन युवक ठार झाले. ही घटना मलकापूर पांग्रा परिसरातील दुसरबीड फाट्याजवळ घडली. लग्न समारंभासाठी पुण्यावरून आलेल्या दोन्ही युवकांवर परतीच्या प्रवासात असताना काळाने झडप घातली. रोशन नांदूरकर (वय २९) आणि शुभम पांडुरंग वंजाळे (वय २८, रा. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती) अशी मृतकांची नावे आहेत.

लग्नावरून परतताना काळाचा घाला;मलकापूर पांग्रा परिसरातील घटना
फकीरा पठाण
मलकापूर पांग्रा : भरधाव मालवाहु ॲपेला दुचाकीने धडक दिल्याने दोन युवक ठार झाले. ही घटना मलकापूर पांग्रा परिसरातील दुसरबीड फाट्याजवळ घडली. लग्न समारंभासाठी पुण्यावरून आलेल्या दोन्ही युवकांवर परतीच्या प्रवासात असताना काळाने झडप घातली. रोशन नांदूरकर (वय २९) आणि शुभम पांडुरंग वंजाळे (वय २८, रा. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती) अशी मृतकांची नावे आहेत.
मांडवा शिवारात बोअरवेल मशीनवरून पडून मजुराचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, रोशन नांदूरकर (वय २९) आणि शुभम पांडुरंग वंजाळे हे दोघे पुण्याहून बीबी येथे लग्नासाठी मोटारसायकलने आले होते. लग्नकार्य आटोपून ते आपल्या गावी परत जात असताना मलकापूर पांग्रा येथून पुढे दुसरबीड फाट्याजवळील वळणावर भरधाव वेगाने जात असलेल्या एमएच २७ बीएच ६२७६ क्रमांकाच्या मोटारसायकलने समोरून येणाऱ्या एमएच ५० ५३६४ क्रमांकाच्या मालवाहु ॲपेला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, रोशन नांदूरकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर शुभम वंजाळे गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमी शुभम यांना मलकापूर पांगरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी ॲम्बुलन्सद्वारे हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातात दोघांचाही मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच बीबी पोलीस ठाण्याचे कर्मचारी रवी चव्हाण आणि दिनेश चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
दरम्यान, वळणावर आणि भरधाव वेगामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आनंदाच्या प्रसंगानंतर घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

