Laborer dies :पोट भरण्यासाठी आलेल्या छत्तीसगडच्या मजुराचा बोअरवेलच्या मशीनवरून पडून मृत्यू झाला. ही घटना लोणार तालुक्यातील मांडवा शिवारात २८ एप्रिल रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अमित कुमार मानसिंग तेता (वय २२), रा. छत्तीसगड असे मृतक युवकाचे नाव आहे.

रात्रीच्या कामादरम्यान अपघात; मृतक मजूर छत्तीसगडचा
रमेश खंडागळे
बिबी : पोट भरण्यासाठी आलेल्या छत्तीसगडच्या मजुराचा बोअरवेलच्या मशीनवरून पडून मृत्यू झाला. ही घटना लोणार तालुक्यातील मांडवा शिवारात २८ एप्रिल रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अमित कुमार मानसिंग तेता (वय २२), रा. छत्तीसगड असे मृतक युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन हरिभाऊ कुहिटे यांच्या शेतात २८ एप्रिल रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास बोअरवेलचे काम सुरू होते. यावेळी बोअरवेलच्या दुसऱ्या गाडीवर झोपलेला अमित कुमार मानसिंग तेता (वय २२), रा. छत्तीसगड, हा अचानक गाडीवरून खाली पडला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली.
अमित तेता हा जालना जिल्ह्यातील विष्णू शिंदे यांच्या बोअरवेल वाहनावर मजूर म्हणून काम करत होता. घटनेची माहिती त्याच कामावरील कांबळे नावाच्या व्यक्तीने लोणार तालुक्यातील एजंट मदन हरिभाऊ आंधळे (रा. बीबी) यांना फोनद्वारे दिली. त्यानंतर आंधळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी मजुराला बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर बीबी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. पुढे शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, त्याला छत्तीसगडला रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणी बीबी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार अरुण मोहिते करीत आहेत.
दरम्यान, बोअरवेलसारख्या धोकादायक कामांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याने अशा घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारांनी कामगारांच्या सुरक्षेकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. एकंदरीत, तरुण वयात झालेल्या या अपघाती मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

