Mahabreaking

[breaking_news]

Working in the scorching :भरउन्हात काम करणे बेतले जीवावर, देऊळगाव राजात युवकाचा मृत्यू

Working in the scorching : गत काही दिवसांपासून देऊळगाव राजा शहरासह जिल्हाभरात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच भर उन्हात बांधकामावर काम करणे एक युवकाच्या जीवावर बेतले. उन्हाचा फटका बसल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना 29 एप्रिल रोजी घडली. राहुल भीकाजी मगर वय 42 वर्ष रा. समता कॉलनी देऊळगावराजा असे मृतक युवकाचे नाव आहे.

Farmer Warrior Action Committee

उष्माघाताने युवकाचा मृत्यू झाल्याचा अंदाज : तापमान वाढल्याने काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : गत काही दिवसांपासून देऊळगाव राजा शहरासह जिल्हाभरात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच भर उन्हात बांधकामावर काम करणे एक युवकाच्या जीवावर बेतले. उन्हाचा फटका बसल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना 29 एप्रिल रोजी घडली. राहुल भीकाजी मगर वय 42 वर्ष रा. समता कॉलनी देऊळगावराजा असे मृतक युवकाचे नाव आहे.दरम्यान, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

राहुल मगर हा युवक सेंट्रिंगचे काम करत होता. बुधवारी तो उन्हात काम करीत असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले. तसेच छातीत दुखत असल्याने तो शहरातील खासगी रुग्णलयात दाखल झाला. त्याला घामही खूप आल्याने तेथून त्यांना ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, तोपर्यंत युवकाचा मृत्यू झाला. उकाड्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
विदर्भात सध्या उष्णतेची लाट जाणवू लागली असून बुलढाणा जिल्ह्यातही उन्हाचा तडाखा वाढला आहे. सोमवारी जिल्ह्यात कमाल तापमानाची नोंद ४३.६ अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली असून, सरासरीच्या तुलनेत तापमानात ४ अंशांनी वाढ झाली आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून नागरिकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २७ एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्याचे किमान तापमान ३०.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवेतील आर्द्रता सायंकाळच्या सुमारास २१ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने कोरड्या उन्हाचा प्रभाव अधिक जाणवत आहे.
संपूर्ण विदर्भ सध्या उष्णतेने होरपळून निघत आहे. सोमवारी विदर्भातील विविध शहरांमधील तापमानाची स्थिती खालीलप्रमाणे राहिली: विदर्भातील अमरावती (४६.६ C) आणि वर्धा (४६.५°C) ही शहरे सर्वाधिक उष्ण ठरली आहेत. त्यानंतर अकोला येथे ४६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपूरमध्ये ४५.० अंश, चंद्रपूरमध्ये ४५.२ अंश आणि यवतमाळमध्ये ४५.२ अंश इतके कमाल तापमान नोंदवले गेले. गोंदिया (४१.०°C) आणि भंडारा (४२.०°C) या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत थोडा कमी राहिला.

नागरिकांना खबरदारीचे आवाहन
जिल्ह्यात वाढत असलेल्या उष्णतेमुळे जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत काम नसेल तर घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, सुती कपड्यांचा वापर करणे आणि उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top