Employees Absent from Office : गत काही दिवसांपासून लोणार पंचायत समितीतील काही कर्मचारी उशीरा कार्यालयात येत असल्याने विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लेटलतीफ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असून, हजेरीत शिस्त आणण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली तातडीने सुरू करण्याची मागणी तालुक्यातील ग्रामस्थांनी केली आहे.

लोणार पंचायत समितीतील प्रकार : अधिकाऱ्यांचे होतेय दुर्लक्ष
भागवत चव्हाण
लोणार : गत काही दिवसांपासून लोणार पंचायत समितीतील काही कर्मचारी उशीरा कार्यालयात येत असल्याने विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लेटलतीफ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असून, हजेरीत शिस्त आणण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली तातडीने सुरू करण्याची मागणी तालुक्यातील ग्रामस्थांनी केली आहे.
लोणार पंचायत समितीमध्ये अनेक अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. ग्रामीण भागातून विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा कर्मचारी अनुपस्थित असल्याने कामे रखडतात, तर काहीजण मॅन्युअल हजेरी नोंदवून बाहेर जात असल्याचेही समोर येत आहे.
ग्रामस्थांच्या मते, काही अधिकारी ‘स्पॉट निरीक्षणा’च्या नावाखाली कार्यालयातून गैरहजर राहतात. त्यामुळे या अनियमिततेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचायत समिती तसेच संलग्न सर्व विभागांमध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करणे अत्यावश्यक आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणीही होत आहे.
लोणार तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने नागरिकांना दूरवरून कार्यालयात यावे लागते. मात्र, संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्याने त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहेत. इतर काही ठिकाणी, जसे तळोदा व साक्री पंचायत समित्यांमध्ये, बायोमेट्रिक प्रणाली सक्तीने लागू करण्यात आल्याने तेथे शिस्त लागल्याचे उदाहरण देत लोणारमध्येही तत्सम कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बायोमेट्रिक प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांच्या येण्या-जाण्याची अचूक नोंद होऊन हजेरीत पारदर्शकता वाढेल. कर्मचारी वेळेवर उपस्थित राहिल्याने नागरिकांची वेळ वाचेल. गैरहजेरी व कामचुकारपणावर प्रशासनाला नियंत्रण ठेवणे सोपे जाईल. दरम्यान, राज्य शासनाने शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली असतानाही लोणारमध्ये त्याची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल नागरिकांनी सवाल उपस्थित केला आहे.

