Speeding Scorpio Overturns : भरधाव स्कार्पिओ टायर फुटल्याने उलटल्याची घटना समृद्धी महामार्गवर रविवारी सकाळी घडली. ही स्कार्पिओ उलटल्यानंतर दुभाजकावर आदळली. यामध्ये पाच जण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने या अपघातात जीवीतहानी झाली नाही.

कारंजा : भरधाव स्कार्पिओ टायर फुटल्याने उलटल्याची घटना समृद्धी महामार्गवर रविवारी सकाळी घडली. ही स्कार्पिओ उलटल्यानंतर दुभाजकावर आदळली. यामध्ये पाच जण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने या अपघातात जीवीतहानी झाली नाही.
काशी विश्वनाथवरून गुजरातमधील वापी येथे जाण्यासाठी निघालेली स्कार्पिओ (क्र. जीजे ०५ जेओ १३५३) सकाळी साडेसातच्या सुमारास चॅनल क्रमांक १६७ वर आली असता अचानक समोरील टायर फुटला. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून गाडी डिव्हायडरला धडकली. त्यानंतर ही स्कार्पिओ दुभाजकावर आदळली. या अपघातात शोएब खान (वय ३५), खुशबू निसा शोएब खान (वय ३०), अरमान खान (वय १२), जिशान खान (वय १०) व येराना खान (वय ८, सर्व रा. वापी, गुजरात) हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग १०८ रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पायलट आतिश चव्हाण व डॉ. नीलेश राठोड यांनी जखमींना प्राथमिक उपचार देत कारंजा उपजिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर मस्के यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी रेफर केले. या मदतकार्यात श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख, समृद्धी रुग्णवाहिकेचे श्याम घोडेस्वार, आई एकवीरा रुग्णवाहिकेचे विनोद खोड, कक्षसेवक विजय शिरसाठ तसेच अधिपरिचारिका पल्लवी यांनीही सहकार्य केले.

