Jaysing Patil Appointed : सांगली जिल्ह्यात पोलीस अधिकारी यांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी पलूस पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे स्थानिक पातळीवर अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले आहे. मावळते पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांची अष्टा येथे बदली झाल्याने रिक्त झालेल्या पदावर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पलूस/सांगली : सांगली जिल्ह्यात पोलीस अधिकारी यांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी पलूस पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे स्थानिक पातळीवर अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले आहे. मावळते पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांची अष्टा येथे बदली झाल्याने रिक्त झालेल्या पदावर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कुंडल पोलीस ठाण्यातील दोन वर्षांच्या कार्यकाळात जयसिंग पाटील यांनी प्रभावी कामगिरी करत कायदा व सुव्यवस्था राखण्यात विशेष यश मिळवले होते. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवत त्यांनी परिसरात ‘गुन्हेमुक्ती’ची प्रतिमा निर्माण केली. सांगली जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी असताना, कुंडलमध्ये खून, हल्ले यांसारख्या घटनांना आळा घालण्यात त्यांनी यश मिळवले, ही त्यांची मोठी कामगिरी मानली जाते.
पाटील यांनी ‘सामुदायिक पोलीस’ संकल्पनेवर भर देत सर्व जाती-धर्मांच्या लोकांशी थेट संवाद साधला. तंटामुक्ती समित्या, सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या सहकार्याने त्यांनी अनेक जमीन व कौटुंबिक वाद सामंजस्याने मिटवले. त्यामुळे परिसरात सामाजिक सलोखा राखण्यात त्यांना यश आले.
वाहतूक व्यवस्थापनाच्या बाबतीतही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. कुंडलमधील वाहतूक कोंडी सोडवत शहरात शिस्त आणली. अपघातप्रवण राज्य महामार्गांवर चालकांमध्ये जनजागृती करत जीवघेण्या अपघातांची संख्या कमी करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. दंडात्मक कारवाईपेक्षा जनजागृतीवर भर देणे ही त्यांची कार्यपद्धती ठरली.
गुन्हे उघडकीस आणण्यातही पाटील यांनी सक्रिय भूमिका बजावली. चोरी, साखळी हिसकावणे आणि पशुचोरी यांसारख्या गुन्ह्यांचा तपास करत त्यांनी जप्त मालमत्ता तक्रारदारांना परत देण्यावर भर दिला. तसेच, राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कुंडल परिसरात विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत पार पाडण्यातही त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.
दरम्यान, पलूस पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात वाढती गुन्हेगारी आणि स्थानिक आव्हाने लक्षात घेता, पाटील यांच्यासमोर नवी कसोटी उभी आहे. त्यांच्या अनुभवाच्या जोरावर पलूसमध्येही गुन्हेगारीवर नियंत्रण येईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता वाढून कायदा-सुव्यवस्थेला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

