Man Arrested : गस्तीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देऊन फरार झालेल्या आरोपीला बोरगाव मंजू पोलिसांनी शेगाव येथून अटक केली आहे.

बोरगाव मंजू पोलिसांनी आरोपीला शेगावातून केली अटक
बोरगाव मंजू : गस्तीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देऊन फरार झालेल्या आरोपीला बोरगाव मंजू पोलिसांनी शेगाव येथून अटक केली आहे.
बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश पुरी हे दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी रात्री गस्त ड्युटीवर होते. ते शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करत असताना, रात्री अंदाजे १ वाजण्याच्या सुमारास ग्राम म्हैसांग येथील कचरूजी महाराज मंदिर परिसरात QR कोड स्कॅन करून पुढील गस्तीसाठी निघाले होते.
दरम्यान, म्हैसांग ते दर्यापूर रोडवर आरोपी शुभम दिनकर मानकर (रा. भुईखेड, ता. दर्यापूर, जि. अमरावती) हा ट्रॅक्टर-ट्रॉलीसह जात असताना त्याने ट्रॅक्टर शासकीय वाहनाजवळ आणला. त्यानंतर कोणतेही कारण नसताना पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश पुरी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून आरोपी तेथून निघून गेला. या घटनेबाबत मिळालेल्या लेखी तक्रारीवरून दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी पोलीस स्टेशन बोरगाव मंजू येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आरोपीच्या शोधासाठी पथके तयार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी, मुर्तिजापूर वैशाली मुळे व पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली.
तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या मदतीने शोध घेत असताना आरोपी शुभम दिनकर मानकर (वय ३०) हा शेगाव (जि. बुलढाणा) येथील रेल्वे स्थानक परिसरात आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आले असून, संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, मनोज उघडे, हेड कॉन्स्टेबल उमेश पुरी, मंगेश सुळे, आकाश यादव तसेच पोलीस कॉन्स्टेबल सचिन सोनटक्के, नितीन गवई, अक्षय देशमुख, प्रसाद विभांडीक, आकाश जंजाळ, अजिंक्य हळदे यांनी केली.

