the two factions of the Shiv Sena : सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीपासून अंतर्गत खदखद वाढत असून, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या समर्थकांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. या गटबाजीमुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची चांगलीच अडचण होत असून, “आता बस्स झालं, आमचा निर्णय आम्हीच घेऊ,” असा पवित्रा काही शिवसैनिकांनी घेतला आहे. येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत गटबाजीऐवजी एकजूट ठेवावी, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा व्यक्त होत आहे.

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार डॉ. शशीकांत खेडेकर यांचे पडले गट
अशोक इंगळे
साखरखेर्डा : सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीपासून अंतर्गत खदखद वाढत असून, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या समर्थकांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. या गटबाजीमुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची चांगलीच अडचण होत असून, “आता बस्स झालं, आमचा निर्णय आम्हीच घेऊ,” असा पवित्रा काही शिवसैनिकांनी घेतला आहे. येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत गटबाजीऐवजी एकजूट ठेवावी, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा व्यक्त होत आहे.
गेल्या तीन दशकांपासून या मतदारसंघात माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा प्रभाव राहिला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवत अनेकांना जिल्हा परिषद सदस्य, उपाध्यक्ष, कृषी सभापती, अर्थ व बांधकाम सभापती, पंचायत समिती सदस्य व सभापती, तसेच विविध संस्थांमध्ये पदांची संधी दिली. प्रत्येक कार्यकर्ता सक्षम व्हावा, ही त्यांची भूमिका होती. मात्र, काही कार्यकर्त्यांनी पदे भोगल्यानंतर त्यांच्यापासून दूर गेल्याचेही बोलले जाते. तरीही डॉ. शिंगणे यांनी कधी नाराजी व्यक्त केली नाही.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उमेदवारी दिली नाही. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला आणि डॉ. शशिकांत खेडेकर आमदार झाले. यावेळी काही कार्यकर्त्यांमध्ये “आमच्यामुळेच आमदार झाले” अशी भावना निर्माण झाली. त्यामुळे पक्षांतर्गत वर्चस्वाची स्पर्धा वाढली.
राष्ट्रवादीतून आलेल्या काही गटांच्या प्रवेशामुळे जुन्या शिवसैनिकांना दुय्यम स्थान मिळत असल्याची भावना निर्माण झाली. ही बाब केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या निदर्शनासही आणून देण्यात आली. या अंतर्गत मतभेदांचा परिणाम लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवरही झाल्याचे बोलले जाते.
सध्या मतदारसंघात कुरघोडीचे राजकारण सुरू असून, साखरखेर्डा गावातही शिवसेना शिंदे गटाचे दोन गट सक्रिय आहेत. वेगवेगळ्या बैठका व कार्यक्रमांमुळे सामान्य शिवसैनिकांमध्ये नाराजी वाढत आहे. इतर पक्षांतून आलेल्या काही कार्यकर्त्यांनी पद मिळवून राजकारण सुरू केल्यापासून मूळ कार्यकर्ते दुखावले गेल्याची भावना व्यक्त होत आहे. “पक्ष म्हणजे काहींची मक्तेदारी झाली आहे,” अशीही खदखद कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.
ही नाराजी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्यात आली असली, तरी परिस्थिती अशीच राहिल्यास आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत नुकसान होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
साखरखेर्डा येथे जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत निवडणुकीत निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घेण्याची परंपरा होती. मात्र, सध्या वेगवेगळ्या बैठका घेऊन कार्यकर्त्यांना आव्हान दिल्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. शेवटी मतदार हा राजा आणि आपण सेवक आहोत, याचे भान ठेवावे, अशी अपेक्षा आहे.
— महेंद्र पाटील, शिवसेना नेते तथा माजी सरपंच.

