MNS Launches Agitation :तालुक्यातील नारायण खेड सह इतर रेती घाटांवरील कथित अवैध उत्खननाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संबंधित प्रकरणात वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत मनसेचे पदाधिकारी यांनी १५ एप्रिल २०२६ रोजी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

गजानन तिडके
देऊळगाव राजा : तालुक्यातील नारायण खेड सह इतर रेती घाटांवरील कथित अवैध उत्खननाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संबंधित प्रकरणात वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत मनसेचे पदाधिकारी यांनी १५ एप्रिल २०२६ रोजी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
मनसेचे शिवादादा पुरंदरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात म्हटले होती की, देऊळगाव राजा तालुक्यातील नारायणपेठ रेती घाट बंद करण्याबाबत १७ मार्च २०२६ रोजी तक्रार देऊनही महसूल विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनानुसार, संबंधित रेती घाटासाठी अधिकृत रॉयल्टी पावत्या असतानाही प्रत्यक्षात शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
“एक रॉयल्टीवर एकच ब्रास रेती वाहतुकीचा नियम असताना प्रत्यक्षात एका रॉयल्टीवर दोन ते तीन गाड्या भरल्या जात आहेत,” असा गंभीर आरोप मनसेने केला आहे. एवढेच नव्हे तर नदीपात्रात पाणी असतानाही जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर रेती उपसा सुरू असल्याने पर्यावरणीय नियमांची पायमल्ली होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकारात संबंधित तलाठी अधिकाऱ्यांचे रेती माफियांशी संगनमत असल्याचा थेट आरोप मनसेने केल्याने या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. महसूल यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत, रेती घाटाची तातडीने पाहणी करून सखोल चौकशी व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मनसेने प्रशासनाला स्पष्ट इशारा देताना, तातडीने कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले जाईल, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. या आंदोलनात तालुकाध्यक्ष बंदुराजे डोळस, शहराध्यक्ष रोमाणे यांच्यासह मनसेचे स्थानिक पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे समजते.या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी तसेच खनिकर्म अधिकारी, बुलढाणा यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता महसूल विभाग या गंभीर आरोपांची दखल घेऊन कोणती भूमिका घेतो, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. शिवादादा पुरंदरे मनविसे जिल्हाध्यक्ष, बंडुराजे डोळस तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष नवनाथ रामाणे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वाघ आदींनी उपोषण सुरू केले आहे.

