Bizarre Three-Vehicle Accident :भरधाव तीन वाहनांच्या विचित्र अपघातात आठ जण जखमी झाल्याची घटना समृद्धी महामार्गावर मेहकर तालुक्यातील फर्दापूरजवळ चॅनेल क्रमांक २९३ वर शुक्रवारी दुपारी घडली. नेक्सा कार समोरील वाहनावर धडकली. त्यानंतर जखमी चालकास बाहेर काढत असतानाच मागून भरधाव वेगाने आलेल्या औरा कारनेही इनोव्हाला धडक दिली. त्यामुळे दोन्ही वाहने नेक्सावर आदळली. या अपघातात मदत करणाऱ्यांसह आठ जण जखमी झाले असून यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत.

मेहकर तालुक्यातील फर्दापूरजवळील घटना ; मदत कार्य सुरू असताना कारची धडक
मेहकर :भरधाव तीन वाहनांच्या विचित्र अपघातात आठ जण जखमी झाल्याची घटना समृद्धी महामार्गावर मेहकर तालुक्यातील फर्दापूरजवळ चॅनेल क्रमांक २९३ वर शुक्रवारी दुपारी घडली. नेक्सा कार समोरील वाहनावर धडकली. त्यानंतर जखमी चालकास बाहेर काढत असतानाच मागून भरधाव वेगाने आलेल्या औरा कारनेही इनोव्हाला धडक दिली. त्यामुळे दोन्ही वाहने नेक्सावर आदळली. या अपघातात मदत करणाऱ्यांसह आठ जण जखमी झाले असून यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत.
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर १० एप्रिलच्या सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास फर्दापूरनजीक चॅनेल क्रमांक २९३ वर मुंबई कॉरिडोर येथे अपघात झाल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर येथील नियंत्रण कक्षातून प्राप्त झाल्यानंतर समृद्धी महामार्ग उपकेंद्र सिंदखेड राजाचे एपीआय इंगळे हे मदतकार्यासाठी सहकाऱ्यांसह घटनास्थळी रवाना झाले. अपघातस्थळावर नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच-१७-बीव्ही-००६१ क्रमांकाच्या नेक्सा कारचा चालक शशांक कृष्णा खेरणार (वय २५) रा. साकूर, ता. संगमनेर याने समोरील अज्ञात वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. जखमीला बाहेर काढत असतानाच एमएच-१४-एच-२१३८ क्रमांकाच्या भरधाव कारने इनोव्हा गाडीला धडक दिली. या अपघातानंतर दोन्ही वाहने नेक्सा कारवर येऊन आदळली. यावेळी मदत करणारे महामार्ग पोलिस आकाश मोहाडे, संतोष सोनुने, सचिन आंधळे व फायरचे परमेश्वर शिंदे हे किरकोळ जखमी झाले. तसेच मदतीला आलेले ट्रकचालक मोईनोद्दीन मोहंमद शेख रा. वसई यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सर्व जखमींना रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी हलविण्यात आले. धडक देणारा औरा कारचा चालक अक्षय चनाप रा. बार्शीटाकळी हा फरार झाला आहे. त्याच्या वाहनातील अमित बोंडे व तेजस वाघोरे हेदेखील किरकोळ जखमी झाले. इनोव्हाचालक निजाम खान वकील खान यांना कोणतीही दुखापत झाली नाही.अपघातानंतर समृद्धी महामार्गावर वाहतुक विस्कळीत झाली होती. गत काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातात वाढ झाली आहे. त्यामुळे, उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.

