Mahabreaking

[breaking_news]

MLA Nitin Deshmukh :महापुरुषांच्या प्रतिमांचा अभाव; आमदार नितीन देशमुखांचा संताप – दिग्रस येथील आमसभा तहकूब!

MLA Nitin Deshmukh :पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथे आयोजित वार्षिक आमसभा व सरपंच शिबिर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अक्षरशः कोलमडल्याची घटना शुक्रवारी (दि. २७ मार्च) घडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उघड झालेल्या त्रुटींमुळे आमदार नितीन देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत स्वागत नाकारले, तर अखेर सभा तहकूब करण्याची वेळ आली.

MLA Nitin Deshmukh

अधिकाऱ्यांची दांडी, सरपंचांना निमंत्रण नाही; प्रशासनाच्या गोंधळात सभा रद्द

राहुल सोनोने

दिग्रस बु : पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथे आयोजित वार्षिक आमसभा व सरपंच शिबिर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अक्षरशः कोलमडल्याची घटना शुक्रवारी (दि. २७ मार्च) घडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उघड झालेल्या त्रुटींमुळे आमदार नितीन देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत स्वागत नाकारले, तर अखेर सभा तहकूब करण्याची वेळ आली.

दरवर्षीप्रमाणे पातूर तालुक्याच्या वतीने सरपंचांना निमंत्रित करून आयोजित केली जाणारी ही महत्त्वाची सभा यंदा नियोजनशून्यतेचा बळी ठरली. अनेक सरपंचांना निमंत्रणच न मिळाल्याने त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. यामुळे सभेची वैधता आणि उद्देशच प्रश्नचिन्हात आला.

दरम्यान, उद्घाटनासाठी आमदार देशमुख व्यासपीठावर पोहोचले असता, कार्यक्रमस्थळी महापुरुषांच्या प्रतिमा किंवा छायाचित्रांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले. यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत स्वागतासाठी आणलेले शाल व पुष्पहार नाकारले. “महापुरुषांचा सन्मान न राखणारा कार्यक्रम हा अपूर्णच आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

यापुढे परिस्थिती अधिकच गंभीर झाली, कारण ग्रामस्थांच्या समस्या मांडण्यासाठी आयोजित या सभेला संबंधित विभागांचे अधिकारी अनुपस्थित होते. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच जिल्हा स्तरावरील अधिकारी गैरहजर असल्याने उपस्थितांमध्ये असंतोष पसरला. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर जोरदार नाराजी व्यक्त केली.

या सर्व पार्श्वभूमीवर कोणताही विषय न घेता सभा तहकूब करण्यात आली. परिणामी, गावकऱ्यांमध्ये निराशा पसरली असून, त्यांच्या समस्या पुन्हा एकदा प्रलंबितच राहिल्या आहेत.

राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्त्वाच्या बैठकीतच अशी ढिसाळ व्यवस्था असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आगामी काळात याचा राजकीय परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top