Zilla Parishad School : जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण आणि नवोन्मेषी शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी “झेप” या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. शिक्षकांच्या सृजनशीलतेला चालना देत शैक्षणिक परिवर्तन साध्य करण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी केले.

नाविन्यपूर्ण शिक्षकांना व्यासपीठ; “झेप” उपक्रमातून शाळांमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत
बुलढाणा : जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण आणि नवोन्मेषी शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी “झेप” या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. शिक्षकांच्या सृजनशीलतेला चालना देत शैक्षणिक परिवर्तन साध्य करण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी केले.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित कार्यशाळेत जिल्ह्यातील १५० नाविन्यपूर्ण शिक्षकांचा सहभाग होता. अध्यक्षस्थानावरून बोलताना गुलाब खरात यांनी “शिक्षकांची उपक्रमशीलता म्हणजे सृजनशील संशोधनाचेच एक रूप आहे,” असे सांगत, आगामी शैक्षणिक सत्रात जिल्हा परिषद शाळांमध्ये सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीतही जिल्हा परिषद शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सातत्याने नवे प्रयोग करत आहेत. मात्र या प्रयोगांना व्यापक व्यासपीठ मिळत नसल्याने त्यांचा प्रसार मर्यादित राहतो. “झेप” उपक्रमाच्या माध्यमातून एका शाळेतील यशस्वी उपक्रम दुसऱ्या शाळेत पोहोचवून ज्ञानाचे आदानप्रदान सुलभ केले जाणार आहे.
कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल आकाळ, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. मारुती गायकवाड, व्याख्याते गजानन राऊत, उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर, शेख अकिल आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात विकास पाटील यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेत शिक्षकांनी विद्यार्थीस्नेही दृष्टीकोन ठेवत शाळांचा पट वाढवावा, असे आवाहन केले. यावेळी डॉ. जगराम भटकर यांनी मार्गदर्शन केले, तर गजानन राऊत यांनी प्रेरणादायी विचार मांडले. कार्यशाळेत निवडक शिक्षकांनी त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण करून उपस्थितांना प्रेरित केले.दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन अरविंद शिंगाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

