Massive Fire in Chikhli :शहरातील मुख्य बाजारपेठ आणि कायम गजबजलेले ठिकाण असलेल्या जयस्तंभ चौकात रविवारी (१५ मार्च) दुपारी भीषण आग लागून तब्बल आठ दुकाने भस्मसात झाली. या आगीत विविध व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

जयस्तंभ चौकात आगीनं घेतला रौद्र अवतार; गॅस सिलेंडरमुळे क्षणभर भीतीचं वातावरण
चिखली : शहरातील मुख्य बाजारपेठ आणि कायम गजबजलेले ठिकाण असलेल्या जयस्तंभ चौकात रविवारी (१५ मार्च) दुपारी भीषण आग लागून तब्बल आठ दुकाने भस्मसात झाली. या आगीत विविध व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, जयस्तंभ चौकातील दुकानांच्या ओळीत दुपारी अचानक आग लागली आणि क्षणार्धात ती पसरत गेली. या आगीत अमोल श्रीनाथ यांचे ‘रेणुका माता मोबाईल सेंटर’, किरण घोलप यांचे ‘जगदंबा वॉच सेंटर’, बाळू हांडगे यांचे ‘हांडगे मामा भेळ सेंटर’, राजेश राजपूत यांचे ‘राजपूत भेळ सेंटर’, ‘वसुंधरा ॲग्रो सेंटर’, सचिन बोंद्रे यांचे ‘अंबिका ॲग्रो सेंटर’, जयंत सुतरिया यांचे ‘जलाराम दाबेली सेंटर’ यांसह परिसरातील काही फळ विक्रेत्यांचे स्टॉल्स आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
आगीमुळे परिसरात धुराचे मोठमोठे लोट पसरले होते. विशेष म्हणजे भेळ सेंटरसह काही दुकानांत गॅस सिलेंडर असल्याने मोठा स्फोट होण्याची भीती निर्माण झाली होती, त्यामुळे काही काळ परिसरात प्रचंड दहशत पसरली होती. या भागात दुकाने एकमेकांना लागून असल्याने आग इतर दुकानांमध्ये पसरण्याची शक्यता निर्माण झाली होती.
घटनेची माहिती मिळताच चिखली नगरपालिकेच्या अग्निशमन दलाची दोन वाहने तातडीने घटनास्थळी दाखल झाली. आगीचे रौद्ररूप लक्षात घेता बुलढाणा नगरपालिकेचे अग्निशमन दल देखील मदतीसाठी दाखल झाले. तीनही अग्निशमन वाहनांनी पाण्याचे फेरे मारत शर्थीचे प्रयत्न करून अखेर आगीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, गोपाल देव्हडे यांच्यासह स्थानिक नागरिकांनीही मिळेल त्या साधनांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. वेळीच आग आटोक्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अनेक दुकाने जळून खाक झाल्याने संबंधित व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या भीषण घटनेची माहिती मिळताच आमदार श्वेता महाले, नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, तहसीलदार विजय सवडे, मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांच्यासह अनेक मान्यवरांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व नुकसानग्रस्त व्यावसायिकांना दिलासा दिला. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्रशासनाकडून पुढील चौकशी सुरू आहे.

