Deepening of the Bhogavati riverbed :साखरखेर्डा परिसरातून वाहणाऱ्या भोगावती नदीपात्रात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढण्यासाठी शेतकरी पुढे सरसावले असून लोकसहभागातून नदीचे खोलीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे. नदीतील गाळ शेतीसाठी उपयुक्त असल्याने अनेक शेतकरी हा गाळ काढून आपल्या शेतात टाकत आहेत.

शेतकऱ्यांचा पुढाकार; नदीतील गाळ काढून शेतीसाठी वापर, पाणीसाठा वाढण्याची अपेक्षा
साखरखेर्डा : साखरखेर्डा परिसरातून वाहणाऱ्या भोगावती नदीपात्रात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढण्यासाठी शेतकरी पुढे सरसावले असून लोकसहभागातून नदीचे खोलीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे. नदीतील गाळ शेतीसाठी उपयुक्त असल्याने अनेक शेतकरी हा गाळ काढून आपल्या शेतात टाकत आहेत.
साखरखेर्डा भागातून वाहणाऱ्या भोगावती नदीवर माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या पुढाकारातून शिंदी, साखरखेर्डा व सवडद परिसरात सहा ठिकाणी केटी वेअर (लघु बंधारे) बांधण्यात आले होते. या बंधाऱ्यांमुळे वर्षातील किमान आठ महिने नदीपात्रात पाणीसाठा राहतो. मात्र मार्च महिन्यात नदी कोरडी पडल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचून पात्र भरून गेले आहे.
या गाळामध्ये नैसर्गिक अन्नद्रव्ये असल्याने तो रासायनिक खतांपेक्षा पिकांसाठी अधिक पोषक ठरतो. त्यामुळे नदीलगतच्या शेतकऱ्यांनी एकत्र येत नदीपात्रातील गाळ काढण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. विशेष म्हणजे हे काम पूर्णपणे लोकसहभागातून सुरू असून शासनावर कोणताही आर्थिक भार पडत नाही, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, शिंदी परिसरातही नदीतील गाळ काढण्यासाठी शेतकरी संघटित होत असून सरपंच अशोक खरात यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. नदीपात्रातील गाळ काढल्यामुळे बंधाऱ्यांमध्ये पाण्याची साठवण क्षमता वाढणार असून त्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे. यामुळे विहिरींची पाणीपातळी वाढण्यासही मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्या मार्च महिन्यात परिसरातील अनेक विहिरी कोरड्या पडत असल्याने भविष्यात पाण्याची टंचाई टाळण्यासाठी नदीचे खोलीकरण महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे साखरखेर्डा परिसरातील काही शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला असला तरी अधिकाधिक शेतकऱ्यांनी पुढे येऊन लोकसहभाग वाढवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रतिक्रिया :
“शेतकऱ्यांनी लोकसहभागातून नदीचे खोलीकरण सुरू केले आहे. हा उपक्रम अत्यंत फायद्याचा असून शेतकऱ्यांना खोलीकरण व गाळ काढण्यासाठी लागणारे सर्व सहकार्य देण्यास आम्ही तयार आहोत.”
— उल्हास देशपांडे, प्रदेश सदस्य, भाजप

