Start a maize purchasing center : धोत्रा नंदाई परिसरातील शेतकऱ्यांना शासकीय हमीभावाने मका विक्री करता यावी यासाठी देऊळगाव मही येथे शासकीय दराने मका खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी भाजप युवा नेते गणेश रामदास नागरे यांनी तहसीलदार, देऊळगाव राजा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

देऊळगाव मही : धोत्रा नंदाई परिसरातील शेतकऱ्यांना शासकीय हमीभावाने मका विक्री करता यावी यासाठी देऊळगाव मही येथे शासकीय दराने मका खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी भाजप युवा नेते गणेश रामदास नागरे यांनी तहसीलदार, देऊळगाव राजा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांचा गौरव; गृहिणींनाही सन्मानाची गरज
धोत्रा नंदाई परिसरातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर मका पिकाची लागवड केली जाते. या भागातील बहुतांश शेतकरी मका पिकावर अवलंबून असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात मका उत्पादन घेतले जाते. मात्र या परिसरात शासकीय दराने मका खरेदी करण्यासाठी अधिकृत खरेदी केंद्र उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सध्या मका विक्रीसाठी शेतकऱ्यांना दूरवरच्या खरेदी केंद्रांवर जावे लागते. त्यामुळे वाहतूक खर्च वाढतो, वेळेचा अपव्यय होतो तसेच लहान व मध्यम शेतकऱ्यांना हा खर्च परवडणारा नसतो. अनेक वेळा तातडीच्या गरजेमुळे शेतकऱ्यांना स्थानिक व्यापाऱ्यांकडे कमी दराने मका विकावा लागतो, परिणामी त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
या पार्श्वभूमीवर देऊळगाव मही येथे शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्यास परिसरातील शेतकऱ्यांना शासकीय हमीभावाने मका विक्री करता येईल आणि त्यांना आर्थिक दिलासा मिळेल, असे गणेश नागरे यांनी नमूद केले आहे.
तसेच देऊळगाव मही येथे खरेदी केंद्र सुरू झाल्यास धोत्रा नंदाई परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना थेट लाभ होईल. शेतकऱ्यांचा वेळ आणि वाहतूक खर्चही मोठ्या प्रमाणात वाचेल. त्यामुळे प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर देऊळगाव मही येथे शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणीही गणेश नागरे यांनी केली आहे.

