Imran Khan : इमरान खान यांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार अदियाला जेल येथे कैद असलेल्या खान यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी सुमारे ८५ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी त्यांच्या तातडीच्या वैद्यकीय तपासणीचे कडक आदेश दिले.

कराची : इमरान खान यांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार अदियाला जेल येथे कैद असलेल्या खान यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी सुमारे ८५ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी त्यांच्या तातडीच्या वैद्यकीय तपासणीचे कडक आदेश दिले.
खान यांनी जेल अधिकाऱ्यांकडे वारंवार धूसर दिसत असल्याची तक्रार केली होती. पीआयएमएस रुग्णालय येथील तज्ज्ञांनी उपचार म्हणून इंजेक्शन दिले होते; मात्र अहवालानुसार आतापर्यंत केवळ १५ टक्के दृष्टीच परत मिळाली आहे.
या प्रकरणाची सुनावणी मुख्य न्यायाधीश याह्या अफरीदी आणि न्यायमूर्ती शाहिद बिलाल हसन यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर झाली. न्यायालयाने नियुक्त केलेले न्यायमित्र सलमान सफदर यांनी जेलमध्ये खान यांची भेट घेऊन सविस्तर अहवाल सादर केला. त्यानुसार ऑक्टोबर २०२५ पर्यंत खान यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी ६/६ (सामान्य) होती; मात्र जेलमध्ये सतत धूसर दिसू लागल्यानंतर उजव्या डोळ्याची दृष्टी अचानक कमी झाली. तपासात डोळ्यात रक्ताचा थक्का जमल्याने गंभीर नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले.
सर्वोच्च न्यायालयाचे कडक निर्देश
न्यायालयाने सरकारला १६ फेब्रुवारीपूर्वी तज्ज्ञ नेत्ररोगतज्ज्ञांकडून खान यांची सखोल वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. तसेच प्रशासनाला पुढील सूचनाही देण्यात आल्या—
खान यांना त्यांच्या मुलांशी, कासिम खान आणि सुलेमान खान, दूरध्वनीवर संवाद साधण्याची सुविधा द्यावी. त्यांच्या खासगी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास परवानगी द्यावी. या घडामोडींमुळे पाकिस्तानातील राजकीय आणि मानवी हक्कांच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.

