Provide clean water : पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर बाळापूर शहरातील नागरिकांनी नगर परिषद आणि महावितरण प्रशासनाकडे पाणीपुरवठा व वीजव्यवस्थेच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी जोरदार मागणी केली आहे. इस्तामपुरा परिसरासह संपूर्ण शहरात दूषित पाणीपुरवठा आणि वारंवार होणाऱ्या वीजखंडिततेमुळे नागरिक हैराण झाले असून, याबाबत प्रशासनाला लेखी निवेदन देऊन त्वरित कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

बाळापूर : पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर बाळापूर शहरातील नागरिकांनी नगर परिषद आणि महावितरण प्रशासनाकडे पाणीपुरवठा व वीजव्यवस्थेच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी जोरदार मागणी केली आहे. इस्तामपुरा परिसरासह संपूर्ण शहरात दूषित पाणीपुरवठा आणि वारंवार होणाऱ्या वीजखंडिततेमुळे नागरिक हैराण झाले असून, याबाबत प्रशासनाला लेखी निवेदन देऊन त्वरित कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नागरिकांनी नमूद केले आहे की, रमजान महिन्यात उपवास (रोजा), धार्मिक विधी आणि स्वच्छतेला विशेष महत्त्व असल्याने स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा अत्यावश्यक आहे. सध्या शहरात येणारे पाणी दूषित, दुर्गंधीयुक्त व आरोग्यास धोकादायक असल्याने आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे रमजानपूर्वी संपूर्ण शहरातील पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनची तातडीने स्वच्छता करून सुरळीत व स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांनाही स्वतंत्र निवेदन देत शहरातील इलेक्ट्रिक डी.पी. आणि वीजवाहिन्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. अनेक भागांत तांत्रिक बिघाडामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून, रमजान काळात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत सर्व डी.पी. व वीजवाहिन्यांचे देखभाल-दुरुस्तीचे काम पूर्ण करून अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करावा, अशी स्पष्ट मागणी नागरिकांनी केली आहे. रमजानपूर्वी तातडीची कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. प्रशासनाने या गंभीर विषयाची त्वरित दखल घेऊन जलद व प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

