Mahabreaking

[breaking_news]

sanjay Raymulkar :तांडा वस्ती रस्त्यात भ्रष्टाचाराचा आरोप; संजय रायमुलकरांच्या मध्यस्थीने महिलांचे उपोषण स्थगित

sanjay Raymulkar : देऊळगाव कुंडपाळ येथील तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर २० लाख रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अपहार झाल्याचा आरोप करत बंजारा समाजातील सुमारे ४० महिलांनी लोणार पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण अखेर स्थगित केले. माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर प्रशासनाने चौकशी व कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर महिलांनी उपोषण मागे घेतले.

sanjay Raymulkar

मेहकर : देऊळगाव कुंडपाळ येथील तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर २० लाख रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अपहार झाल्याचा आरोप करत बंजारा समाजातील सुमारे ४० महिलांनी लोणार पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण अखेर स्थगित केले. माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर प्रशासनाने चौकशी व कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर महिलांनी उपोषण मागे घेतले.

तांडा वस्ती सुधार योजनेतून बंजारा वस्तीत अंतर्गत रस्त्यासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप करत महिलांनी दोन दिवसांपूर्वी उपोषण सुरू केले होते. रस्त्याची जाडी, सिमेंट काँक्रीटचे प्रमाण तसेच मुरूम व इतर साहित्याचा वापर नियमबाह्य पद्धतीने झाल्याचा आरोप करण्यात आला. काम पूर्ण झाल्याचे दाखवून निधी उचलण्यात आला असला तरी प्रत्यक्षात काही ठिकाणी रस्ता उखडू लागल्याचा दावा महिलांनी केला.

या प्रकरणात ठेकेदार व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून शासकीय निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप करत १५ दिवसांत सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि अपहाराची रक्कम वसूल करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली होती.

आंदोलनाची दखल घेत माजी आमदार संजय रायमुलकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन महिलांच्या मागण्या जाणून घेतल्या. त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खरात व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख यांच्याशी संपर्क साधून प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्याची मागणी केली. शासकीय निधीच्या अपहारासारख्या गंभीर बाबतीत कोणालाही पाठीशी घालू नये, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली.

प्रशासनाकडून चौकशीचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर महिलांनी उपोषण मागे घेतले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी, पंचायत समिती अधीक्षक रविंद्र मापारी यांच्यासह बंजारा समाजाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपोषणकर्त्या महिलांनी दिला असून तांडा वस्ती सुधार योजनेचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचावा, अशी मागणी होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top