BJP : अकोला महानगरपालिकेत शुक्रवारी झालेल्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपने सत्ता हस्तगत करत राजकीय वर्चस्व सिद्ध केले. भाजपच्या शारदा खेडकर या महापौरपदी, तर अमोल गोगे हे उपमहापौरपदी विजयी झाले. शहर सुधार समितीच्या मतदानात भाजप उमेदवारांना ४५ मते मिळाली, तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुरेखा काळे यांना ३२ मते मिळाली.

अकोला : अकोला महानगरपालिकेत शुक्रवारी झालेल्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपने सत्ता हस्तगत करत राजकीय वर्चस्व सिद्ध केले. भाजपच्या शारदा खेडकर या महापौरपदी, तर अमोल गोगे हे उपमहापौरपदी विजयी झाले. शहर सुधार समितीच्या मतदानात भाजप उमेदवारांना ४५ मते मिळाली, तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुरेखा काळे यांना ३२ मते मिळाली.
निवडणुकीपूर्वी भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी सत्तास्थापनेचा दावा केल्याने राजकीय वातावरण तापले होते. मात्र, निर्णायक क्षणी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपचे बहुमत स्पष्ट झाले आणि महापौरपदावर भाजपचा शिक्कामोर्तब झाला. अकोला शहराच्या विकासासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले.
या निवडणुकीत भाजपचे अपक्ष बंडखोर आशिष पवित्रकार यांनी अखेर भाजपलाच मतदान केले. तर एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले.
एमआयएमची तटस्थ भूमिका, विरोधकांत नाराजी
महापौर व उपमहापौर निवडणुकीत भाजप व मित्रपक्षांच्या शहर सुधार समितीने भाजप उमेदवारांच्या बाजूने एकसंघ मतदान केले. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) व अन्य विरोधी पक्षांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. मात्र, एमआयएमच्या तटस्थ भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.
काँग्रेस–एमआयएममध्ये वाद
एमआयएमच्या तटस्थ भूमिकेनंतर काँग्रेस नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक वाद झाला. या वादादरम्यान काँग्रेस नगरसेवकांनी निषेधार्थ बांगड्या फेकल्याचा प्रकार घडला. त्यानंतर एमआयएम नगरसेवकांनी बाहेर येत काँग्रेस नगरसेवकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचा आरोप केला. या घटनेमुळे काही काळ महापालिका परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
शासकीय शोकामुळे जल्लोष टाळला
महापौर व उपमहापौर पदावर विजय मिळवूनही, शासकीय शोक जाहीर असल्याने भाजप व शहर सुधार समितीने कोणताही जल्लोष न करता संयम पाळल्याचे चित्र दिसून आले. शोकाकूल वातावरणातच भाजपने अकोला महापालिकेतील सत्तास्थापना केली.

