Republic Day celebrated : EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या बुलढाणा येथील साखळी उपोषण मंडपात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८.३० वाजता संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच एस.टी. महामंडळाचे सेवानिवृत्त विभागीय वाहतूक अधीक्षक एन. एम. काझी यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

बुलढाणा : EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या बुलढाणा येथील साखळी उपोषण मंडपात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८.३० वाजता संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच एस.टी. महामंडळाचे सेवानिवृत्त विभागीय वाहतूक अधीक्षक एन. एम. काझी यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
याप्रसंगी शोभाताई आरस (राष्ट्रीय अध्यक्षा, महिला आघाडी), सरिताताई नारखेडे (राष्ट्रीय सचिव, महिला आघाडी), लक्ष्मीताई गव्हाळे (कार्यकर्त्या, बुलढाणा), सुधीरजी चांडगे (सचिव, महाराष्ट्र प्रदेश), बी. एस. नारखेडे (राष्ट्रीय कोषाध्यक्ष), अशोक दाभाडे (जिल्हा समन्वयक, बुलढाणा), एम. एस. भालेराव (माजी बीडीओ, पंचायत समिती देऊळगाव राजा) यांची विशेष उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने सर्वांना शुभेच्छा देत स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांना वंदन केले. मार्गदर्शन करताना केंद्र सरकारकडून वृद्ध पेन्शनधारकांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत तीव्र खंत व्यक्त करण्यात आली.
गेल्या २५९० दिवसांपासून ऊन, वारा, पाऊस व कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता EPS-95 पेन्शनधारक मा. कमांडर अशोक राऊत (राष्ट्रीय अध्यक्ष) यांच्या समर्थ नेतृत्वाखाली सनदशीर मार्गाने लढा देत आहेत. कायदेशीर चौकटीत सर्व प्रकारची आंदोलने करूनही मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वेळा प्रत्यक्ष भेटीत दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण न झाल्याने प्रजासत्ताक दिनीही साखळी उपोषण सुरूच असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
गत सात वर्षांपासून EPS-95 पेन्शनधारकांच्या पेन्शनवाढी व न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेला हा लढा योग्य न्याय मिळेपर्यंत एकजुटीने सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, मा. कमांडर अशोक राऊत (राष्ट्रीय अध्यक्ष), मा. विरेंद्र सिंग राजावत (राष्ट्रीय महासचिव) यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेत्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त संदेश पाठवून देशातील वृद्ध नागरिकांच्या हक्कांसाठी अखेरपर्यंत साथ देण्याचे आवाहन केले.
मुख्यालय बुलढाणा येथून ज्येष्ठ नेते गरकल नाना, एस. पी. इंगळे, डी. जे. कव्हळकर, डी. एन. कापडे, एन. डी. खोडके, तसेच महावीर काळे (तालुका सचिव), बैरवारजी (तालुका अध्यक्ष) यांच्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व EPS-95 पेन्शनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. आर. गवई (सचिव, NAC जिल्हा बुलढाणा) यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रमोद सनगाळे यांनी मानले.

