stole sprinkler nozzles : शेतकऱ्यांच्या स्प्रिंकलरच्या तांब्याच्या तोट्या लंपास करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या कारवाईत तब्बल ८ चोरीच्या गुन्ह्यांची यशस्वी उकल करण्यात आली असून सुमारे ८० हजार रुपये किंमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडाकेबाज कारवाई
बुलढाणा : शेतकऱ्यांच्या स्प्रिंकलरच्या तांब्याच्या तोट्या लंपास करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या कारवाईत तब्बल ८ चोरीच्या गुन्ह्यांची यशस्वी उकल करण्यात आली असून सुमारे ८० हजार रुपये किंमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील शेती उपयोगी वस्तूंच्या चोरीच्या गुन्ह्यांचा सखोल तपास करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर (स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा) यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले. या पथकाच्या माध्यमातून मेहकर, लोणार, जानेफळ, डोणगाव व इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू करण्यात आला.
दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी फिर्यादी महादेव किसन मोहरुत (वय २५, रा. धार, ता. मेहकर) यांनी पोलीस ठाणे जानेफळ येथे तक्रार दिली होती. दि. २ डिसेंबर २०२५ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातून १४१ नग तांब्याच्या स्प्रिंकलरच्या तोट्या, अंदाजे ४२,३०० रुपये किमतीच्या, चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी पो.स्टे. जानेफळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.असाच एक गुन्हा जानेफळ पोलिसात आधीच दाखल होता. गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत दि. २२ जानेवारी २०२६ रोजी दोन्ही गुन्ह्यांची उकल केली. तपासात दोन आरोपी निष्पन्न होऊन त्यांना चोरीस गेलेल्या मुद्देमालासह अटक करण्यात आली.देवराज युवराज पवार (वय २२, रा. बीबी हमु, मोहना खुर्द, ता. मेहकर) व उमेश राजू पवार (वय २५, रा. मोहना खुर्द, ता. मेहकर) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या आरोपींकडून मेहकर (२), डोणगाव (२), लोणार (२) व जानेफळ (२) अशा एकूण ८ चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली असून पुढील तपास सुरू आहे. अटक आरोपींना जानेफळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
चोरीस गेलेल्या स्प्रिंकलरच्या तांब्याच्या तोट्या किंमत अंदाजे ८०,००० रुपये पोलिसांनी आरोपींकडून जप्त केल्या आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव) व अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोनि. सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि प्रताप बाजड, पोहेका शरद गिरी, पुरुषोत्तम आघाव, पोको निलेश राजपूत, राजेंद्र गडकर, चापोहेका विकास देशमुख (स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा) तसेच पो.स्टे. जानेफळचे सपोनि अजिनाथ मोरे, पोउपनि संतोष जाधव, पोहेका मोहन सावंत, पोको प्रदीप सौभागे, महादेव काळे, देवेंद्र इंगळे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

