A woman safely delivered : ग्रामीण भागातून आजारी रुग्णांना उपचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. मात्र रस्त्यांची दुरवस्था व वाहनांच्या कमतरतेमुळे अनेकदा उपचाराअभावी दुर्दैवी घटना घडतात. अशा परिस्थितीत डॉक्टरांची तत्परता व सतर्कता अनेकदा जीव वाचविण्याचे काम करते. याचाच प्रत्यय देऊळगाव राजा तालुक्यात आला असून १०८ रुग्णवाहिकेतच एका महिलेची यशस्वी प्रसूती करण्यात आली. डॉ. अक्षय गुठे यांच्या सतर्कतेमुळे नवजात बाळ व प्रसूती महिला दोघेही सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली आहे.

देऊळगाव राजा : ग्रामीण भागातून आजारी रुग्णांना उपचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. मात्र रस्त्यांची दुरवस्था व वाहनांच्या कमतरतेमुळे अनेकदा उपचाराअभावी दुर्दैवी घटना घडतात. अशा परिस्थितीत डॉक्टरांची तत्परता व सतर्कता अनेकदा जीव वाचविण्याचे काम करते. याचाच प्रत्यय देऊळगाव राजा तालुक्यात आला असून १०८ रुग्णवाहिकेतच एका महिलेची यशस्वी प्रसूती करण्यात आली. डॉ. अक्षय गुठे यांच्या सतर्कतेमुळे नवजात बाळ व प्रसूती महिला दोघेही सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दि. १७ जानेवारी रोजी देऊळगाव राजा १०८ रुग्णवाहिकेला जुमडा गावातून महिलेच्या प्रसूती वेदनांचा कॉल प्राप्त झाला. या कॉलची तात्काळ दखल घेत डॉ. अक्षय गुठे व रुग्णवाहिका चालक सुभाष कनखर यांनी रुग्णवाहिकेसह जुमडा गाव गाठले. मात्र त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत महिलेच्या प्रसूती वेदना तीव्र झाल्याने, वेळ न दवडता डॉ. गुठे यांनी रुग्णवाहिकेतच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला.
रुग्णवाहिकेत उपलब्ध असलेल्या डिलिव्हरी किटचा योग्य वापर करून सुरक्षितरीत्या प्रसूती करण्यात आली. प्रसूतीदरम्यान बाळाच्या गळ्याभोवती गुंडाळलेली नाळ काळजीपूर्वक काढून बाळाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर नवजात बाळ नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. प्रसूतीनंतर महिला व बाळाची प्रकृती स्थिर व चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेमुळे डॉ. अक्षय गुठे यांच्या तत्परतेचे व व्यावसायिक कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत असून, जुमडा गावासह परिसरात दिवसभर त्यांच्या कार्याचे अभिनंदन करण्यात येत होते.

