Dr. Rajendra Shingne : महाराष्ट्र ही संतांची भूमी असून याच पावन भूमीत १२व्या शतकात विठ्ठल भक्त संत चोखामेळा यांचा जन्म झाला. १४ जानेवारी १२६८ रोजी मेव्हणा राजा (ता. मेहकर) येथे जन्मलेल्या संत चोखामेळा यांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला मानवता, समता व भक्तीचा संदेश दिला. अशा महान संतांच्या जन्मभूमीच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात विकासनिधी मंजूर झाला असून विविध कामे सुरू आहेत. मात्र जोपर्यंत लोकांच्या मनात संत चोखामेळा रुजणार नाहीत, तोपर्यंत जन्मस्थळाचा खरा विकास व लोकोत्सव होणार नाही, असे स्पष्ट मत माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केले. ते संत चोखामेळा यांच्या ७५८ व्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

गजानन भालेकर
मेव्हणा राजा : महाराष्ट्र ही संतांची भूमी असून याच पावन भूमीत १२व्या शतकात विठ्ठल भक्त संत चोखामेळा यांचा जन्म झाला. १४ जानेवारी १२६८ रोजी मेव्हणा राजा (ता. मेहकर) येथे जन्मलेल्या संत चोखामेळा यांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला मानवता, समता व भक्तीचा संदेश दिला. अशा महान संतांच्या जन्मभूमीच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात विकासनिधी मंजूर झाला असून विविध कामे सुरू आहेत. मात्र जोपर्यंत लोकांच्या मनात संत चोखामेळा रुजणार नाहीत, तोपर्यंत जन्मस्थळाचा खरा विकास व लोकोत्सव होणार नाही, असे स्पष्ट मत माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केले. ते संत चोखामेळा यांच्या ७५८ व्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमाला माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, गटविकास अधिकारी मुकेश माहोर, गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले, संत चोखा नामप्रवर्तक प्रा. कमलेश खिल्लारे, माजी जि. प. सदस्य बाबूराव नागरे, गंगाधर जाधव, शिवसेना नेते श्रीनिवास खेडेकर, दादाराव खार्डे, संतोष खांडेभराड, डी. टी. शिंपणे, भाजप नेते डॉ. सुनील कांयदे, राजेंद्र चित्ते, प्रवीण गीते, भगवान मुंडे, प्रा. दिलीप सानप, प्रा. दिलीप झोटे, ओम पऱ्हाड, प्रकाश गीते, नंदा बोंद्रे, दिलीप खरात, अशोक पडघान, गजानन पवार, गजानन काकड, अमोल काकड, दीपक चेके, गजानन घुगे, प्रभाकर माटे, सूरज गुप्ता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. शिंगणे म्हणाले की, उपेक्षित राहिलेल्या संतांच्या स्थळांना अपेक्षित स्थान मिळावे यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले असून त्याला यश आले आहे. येणारा जन्मोत्सव वेगळ्या स्वरूपात साजरा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी संत चोखामेळा अभ्यासक प्रा. कमलेश खिल्लारे यांनी आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून जन्मस्थळाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. लोकसहभाग आणि प्रशासन एकत्र आल्यास येथे पर्यटकांची ओढ निश्चितच वाढेल. संत चोखामेळा यांची जन्मभूमी आपल्या परिसरात आहे, हा अभिमान प्रत्येकाने बाळगायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
माजी जि. प. सदस्य बाबूराव नागरे यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी मुकेश माहोर यांनी केले. सूत्रसंचालन व्ही. एस. जाधव यांनी तर आभार गजानन काकड यांनी मानले.
मेव्हणा राजा येथे बार्टीचे उपकेंद्र सुरू करण्याचा प्रयत्न – हर्षवर्धन सपकाळ
संत चोखामेळा जन्मस्थळाचा विकास केवळ इमारती उभारून होणार नाही. अध्यात्माला विज्ञानाची जोड देत येथे बार्टीचे उपकेंद्र, ग्रंथालय, अभ्यासिका तसेच विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह उभारणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
संत चोखामेळा यांचा जन्मोत्सव खऱ्या अर्थाने लोकोत्सव व्हावा, यासाठी पुढील काळात निश्चितच बदल घडवून आणू, असे त्यांनी सांगितले.

