The bus was engulfed in flames : समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा थराराचा साक्षीदार ठरला. नागपूरहून नाशिककडे भरधाव वेगात धावणाऱ्या एका खाजगी प्रवासी बसला अचानक आग लागल्याने काही क्षणांतच भीषण दृश्य निर्माण झाले. मेहकर तालुक्यातील शिवणी पिसा गावाजवळ ही घटना ६ जानेवारी रोजी पहाटे घडली. आगीच्या ज्वाळा पाहताच प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला; मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली व ३२ प्रवाशांचे प्राण वाचले.

समृद्धी महामार्गावर धावत्या खाजगी बसला भीषण आग; बस जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली
मेहकर: समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा थराराचा साक्षीदार ठरला. नागपूरहून नाशिककडे भरधाव वेगात धावणाऱ्या एका खाजगी प्रवासी बसला अचानक आग लागल्याने काही क्षणांतच भीषण दृश्य निर्माण झाले. मेहकर तालुक्यातील शिवणी पिसा गावाजवळ ही घटना ६ जानेवारी रोजी पहाटे घडली. आगीच्या ज्वाळा पाहताच प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला; मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली व ३२ प्रवाशांचे प्राण वाचले.
नागपूर येथून खासगी बस क्रमांक MH 40 CT 8043 (खुराणा ट्रॅव्हल) ही नाशिककडे जात होती. दरम्यान, मेहकर तालुक्यातील शिवणी पिसा गावाजवळ ट्रॅव्हलच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागली . चालक वाहिद शेख (वय ३६, रा. नागपूर) यांना बसमधून धूर निघत असल्याचे दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बस रस्त्याच्या कडेला उभी केली. आरडाओरड करत त्याने सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरवले. काही मिनिटांतच बसने पूर्ण पेट घेतला आणि डोळ्यादेखत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. संपूर्ण बस जळून खाक झाली असली, तरी सुदैवाने एकाही प्रवाशाचा जीव गेला नाही, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, गोंधळात काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे चालकाने सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिस, महामार्ग पोलिस आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत बस पूर्णतः जळून खाक झाली होती.
या घटनेमुळे काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. एपीआय संदीप इंगळे व त्यांच्या पथकाने तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली आणि पर्यायी मार्गाने वाहने वळवली.
त्या दुर्दैवी घटनेची पुनरावत्ती टळली
विशेष म्हणजे, १ जुलै २०२३ रोजी याच समृद्धी महामार्गावर खाजगी बसला आग लागून २६ निष्पाप प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्या भीषण घटनेच्या जखमा अजूनही ताज्या असतानाच पुन्हा अशी घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या दुर्घटनेनंतर महामार्गावरील सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना झाल्या का, असा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जात आहे.बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातांचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय ठरत आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन, वाहनांची अपुरी तांत्रिक तपासणी आणि आपत्कालीन यंत्रणेची मर्यादित उपलब्धता यामुळेच अशा घटना घडत असल्याचा आरोप प्रवासी आणि नागरिकांकडून केला जात आहे.

