Nipana Zilla Parishad School : स्त्री-शिक्षणाच्या उद्गाती माता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अकोला पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निपाणा येथे माता-पालक संघाच्या वतीने बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

बोरगाव मंजू :स्त्री-शिक्षणाच्या उद्गाती माता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अकोला पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निपाणा येथे माता-पालक संघाच्या वतीने बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय संस्कृतीतील सामाजिक मूल्यांनुसार कन्यापूजन हा एक महत्त्वाचा संस्कार आहे. मुलगी घराची शान असते, त्यामुळे मुलींचे शिक्षण सुसंस्कारक्षम असले पाहिजे या उदात्त हेतूने महिला पालकांनी बालिकांचे पूजन करून त्यांचा सन्मान केला.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा पूजाताई धम्मपाल खंडारे, उपसरपंच कोमल प्रफुल्ल इंगळे, आशा सेविका दुर्गाबाई इंगळे, कांचन इंगळे, राधिका संदीप नाचोणे, सपना इंगळे, पूजा इंगळे, वंदना इंगळे आदी मान्यवर उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक राजेश ओहे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मसन्मान, शिक्षणाची आवड आणि सामाजिक मूल्यांची जाणीव निर्माण करणारा ठरला.

