payment is missing! : देऊळगाव राजा तालुक्यात भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतीला पाणी न देता गावकऱ्यांच्या तहान भागवली. मात्र या सामाजिक जबाबदारीच्या बदल्यात मिळणारा मोबदला आजही शासनाकडे थकीत असून विहीर अधिग्रहण व टँकर पाणीपुरवठ्यापोटी तब्बल पावणेतीन कोटी रुपये थकले आहेत. या गंभीर प्रश्नावर प्रशासनाची उदासीन भूमिका दिसून येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

देऊळगाव राजा तालुक्यात पाणीटंचाईवर शेतकऱ्यांचा त्याग, शासनाकडे पावणेतीन कोटींची थकबाकी
गजानन तिडके
देऊळगाव राजा : देऊळगाव राजा तालुक्यात भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतीला पाणी न देता गावकऱ्यांच्या तहान भागवली. मात्र या सामाजिक जबाबदारीच्या बदल्यात मिळणारा मोबदला आजही शासनाकडे थकीत असून विहीर अधिग्रहण व टँकर पाणीपुरवठ्यापोटी तब्बल पावणेतीन कोटी रुपये थकले आहेत. या गंभीर प्रश्नावर प्रशासनाची उदासीन भूमिका दिसून येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तालुक्यात 2022 पासून कधी अतिवृष्टी तर कधी अल्पवृष्टीमुळे पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहिले. परिणामी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला. अशा स्थितीत शासनाने काही गावांतील विहिरी अधिग्रहित करून तर काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला.
शासनाच्या आदेशानुसार विहीर अधिग्रहणासाठी प्रतिदिन 600 रुपये मोबदला देणे अपेक्षित असताना, 2022 पासून आजतागायत एक दमडीही शेतकऱ्यांच्या हाती पडलेली नाही.“आम्ही शेतीला पाणी न देता गावाला पाणी दिले, ही आमची चूक होती का?” असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
82 विहीर मालकांचा मोबदला थकीत
देऊळगाव राजा तालुक्यातील जवळखेड, वाणेगाव, शिनगाव जहांगीर, अंभोरा, बोराखेडी बावरा, डोईफोडे वाडी, गिरोली बु., उंबरखेड, गोळेगाव, अंढेरा, भिवगाव बु., जुमडा, किनी पवार, चिंचखेड, टाकरखेड वायाळ, दिग्रस बु., गारखेड, जांभोरा, सुलतानपूर, सावंगी टेकाळे, पळसखेड झाल्टा, मेंडगाव, खाल्याळगव्हाण, नारायणखेड, तुळजापूर, बायगाव बु., गारगुंडी, सावखेड नागरे, सावखेड भोई आदी गावांमधील एकूण 82 विहीर मालकांच्या विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या.
थकबाकीचा तपशील
• विहीर अधिग्रहण थकबाकी
o 2022–23 : ₹7,36,800
o 2023–24 : ₹69,93,600
o 2024–25 : ₹29,66,400
o एकूण : ₹1,06,96,800
• टँकर पाणीपुरवठा (2024–25)
o थकबाकी : ₹1,86,00,000
एकूण थकबाकी : पावणेतीन कोटी रुपये
प्रशासनाचे केवळ ‘पाठपुरावा सुरू’ उत्तर
विहीर अधिग्रहण मालक पंचायत समिती व तहसील कार्यालयाच्या चकरा मारत असून, “पाठपुरावा सुरू आहे” या व्यतिरिक्त ठोस उत्तर मिळत नसल्याचा आरोप होत आहे. पाणीटंचाईसारख्या संवेदनशील प्रश्नावर प्रशासन किती गांभीर्याने वागत आहे, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
“81 दिवस माझी विहीर अधिग्रहित होती. शेतीला पाणी न देता पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवले. पण मोबदला आजपर्यंत मिळालेला नाही.”
गोविंदराव वायाळ (विहीर मालक, चिंचखेड)“विहीर अधिग्रहण व टँकर प्रस्तावांना तात्काळ मंजुरी दिली होती. अहवाल वरिष्ठांना सादर केले आहेत. निधी प्राप्त होताच संबंधितांना तात्काळ अदा करण्यात येईल.”
मुकेश माहोर (गटविकास अधिकारी, पंचायत समिती देऊळगाव राजा)“या विषयावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. कॅबिनेट बैठकीतही प्रश्न उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही; लवकरच निधी मिळेल.”
मनोज कायंदे (आमदार, सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ)
राजकीय प्रश्न ऐरणीवर
शेतकऱ्यांनी समाजासाठी केलेल्या त्यागाची किंमत देण्यास शासन अपयशी ठरत असल्याचा आरोप होत असून, पाणीटंचाईच्या प्रश्नावर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी आता कसोटीवर लागली आहे. मोबदला कधी मिळणार, हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच आहे.

