Mahabreaking

[breaking_news]

road from Soygaon-Dhad-Varud Phata :सोयगाव–धाड–वरुड फाटा ते दहिद फाटा डांबरी रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरावस्था

road from Soygaon-Dhad-Varud Phata : बुलढाणा तालुक्यातील सोयगाव ते धाड, वरुड फाटा ते दहिद फाटा या महत्त्वाच्या डांबरी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. खड्ड्यांचे प्रमाण इतके मोठे आहे की रस्त्यावरून जाणारी लहान-मोठी वाहने पलटी होण्याच्या घटना घडत असून नागरिकांचे आर्थिक नुकसान व जीवितास धोका निर्माण झाला आहे.

Soygaon-Dhad-Varud Phata
सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी

 पंडित सावळे

मासरुळ : बुलढाणा तालुक्यातील सोयगाव ते धाड, वरुड फाटा ते दहिद फाटा या महत्त्वाच्या डांबरी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. खड्ड्यांचे प्रमाण इतके मोठे आहे की रस्त्यावरून जाणारी लहान-मोठी वाहने पलटी होण्याच्या घटना घडत असून नागरिकांचे आर्थिक नुकसान व जीवितास धोका निर्माण झाला आहे.

रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः रात्री व अपरात्री खड्डे नजरेस न पडल्याने लहान-मोठे अपघात घडत असून अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे.

सोयगाव ते धाड व वरुड फाटा ते दहिद फाटा हा रस्ता दोन मोठ्या गावांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्याचा वापर करून परिसरातील शेतकरी मका, सोयाबीन, कापूस आदी शेतीमाल धाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात विक्रीसाठी आणतात. तसेच भाजीपाला, दवाखाना, शाळा-महाविद्यालये व दैनंदिन गरजांसाठी या मार्गावर सातत्याने वर्दळ असते.

याशिवाय मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक करणारे टिपर, ट्रॅक्टर, ट्रक व पिकअप वाहने या मार्गावरून ये-जा करतात. जड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था अधिकच खराब झाली असून त्याचा फटका थेट शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

या रस्त्याची अवस्था अनेक वर्षांपासून दयनीय असून नागरिकांनी व शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. काही वेळा रस्ता रोको आंदोलनही करण्यात आले. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तात्पुरती आश्वासने दिली जातात; मात्र त्यावर अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठोस कारवाई न झाल्याने ही मागणी वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. रात्री-अपरात्री नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

“या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आर्थिक नुकसान, अपघातांचा धोका आणि दैनंदिन प्रवासात अडचणी निर्माण होत आहेत. अनेक वेळा आंदोलने करूनही दखल घेतली जात नाही. हे खड्डे जीवघेणे ठरत असून तात्काळ दुरुस्ती गरजेची आहे.”
—   समाधान भाऊ बुधवत, माजी सरपंच, सोयगाव

“सदर रस्त्याची सद्यस्थिती आमच्या निदर्शनास आली आहे. जड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्याचे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या तक्रारी योग्य असून त्याची नोंद घेण्यात आली आहे. तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविण्याचे काम तातडीने करण्यात येईल, तर कायमस्वरूपी दुरुस्ती पुढील टप्प्यात हाती घेण्यात येईल.”
गणेश भागुरे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चिखली

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top