Mahavistar AI campaign : महाविस्तार प्रोत्साहन योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या महाविस्तार एआय मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्तम दहा शेतकऱ्यांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांचा समावेश झाला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

बुलढाणा : महाविस्तार प्रोत्साहन योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या महाविस्तार एआय मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्तम दहा शेतकऱ्यांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांचा समावेश झाला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
दि. १५ सप्टेंबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत महाविस्तार ॲपचा प्रभावी व सातत्यपूर्ण वापर करून संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील श्री. पुरुषोत्तम उखर्डा वाघोडे तसेच मलकापूर तालुक्यातील घिरणी येथील श्री. मंगेश गजानन सुरडकर यांनी राज्यस्तरीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी साध्य केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून कृषी क्षेत्रात नवनवीन संधी निर्माण केल्यामुळे त्यांची प्रगतिशील वृत्ती, मेहनत व जिज्ञासा ही राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी आयुक्त कार्यालय, पुणे येथून प्राप्त झालेले हे प्रशस्तीपत्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी मा. जिल्हाधिकारी डॉ. श्री. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. यावेळी महाविस्तार ॲपचा सातत्यपूर्ण व प्रभावी वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कृषी विभागामार्फत विकसित करण्यात आलेले महाविस्तार ॲप शेतकऱ्यांना विविध डिजिटल सेवा व कृषीविषयक सल्ला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते. एआय चॅटबॉटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मराठीत वैज्ञानिक व विश्वासार्ह सल्ला मिळत असून, शेतीविषयक माहिती, हवामान अंदाज व बाजारभाव यांची माहिती मिळाल्याने योग्य निर्णय घेण्यास मदत होत आहे.
महाविस्तार ॲपचा अधिकाधिक वापर करून शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवावे, यासाठी जिल्ह्यात विविध स्तरांवर जनजागृतीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये गावपातळीवर प्रात्यक्षिके व जनजागृती मोहिमा, कृषी सेवा केंद्रे, कृषी सखी व कृषी ताई यांच्या माध्यमातून शेतकरी गटांचे संघटन, स्थानिक वृत्तपत्रांतून लेख व यशोगाथांचे प्रकाशन, ॲपचा सक्रिय वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार तसेच व्हॉट्सॲप गट व सोशल मीडियाद्वारे माहितीचा प्रसार आदी उपक्रमांचा समावेश आहे.
महाविस्तार ॲपचा लाभ सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्री. किरण पाटील यांनी केले आहे.

