Illegal sand mining: देऊळगाव मही परिसरातील खडकपूर्णा नदीपात्रातून अवैध रेती उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत एक टिप्पर जप्त केला असून, आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण २० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

देऊळगाव राजा पोलिसांची कारवाई ; 20 लाख 20 हजार रुपयांचा एवज केला जप्त
देऊळगाव राजा : देऊळगाव मही परिसरातील खडकपूर्णा नदीपात्रातून अवैध रेती उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत एक टिप्पर जप्त केला असून, आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण २० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सध्या महसूल विभाग तसेच विविध शासकीय यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त असताना नदीपात्रातून अवैध रेती उपसा निर्भयपणे सुरू असल्याचे दिसत होते. २२ नोव्हेंबर रोजी एमएच २८ बीबी ९१७१ क्रमांकाचे टिप्पर खडकपूर्णा नदीपात्रातून चिखली रोडवरील रोहणा फाटा येथे येत असताना पोलिसांच्या गस्ती पथकाला संशय आला. तत्काळ पाठलाग करून पोलिसांनी सदर टिप्पर ताब्यात घेतला. या प्रकरणी आरोपी राजेंद्र विठ्ठल पिटकर, रा. चिखली याच्याविरुद्ध महाराष्ट्र गौण खनिज कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये २० लाख रुपये किमतीचे टिप्पर आणि २ ब्रास रेती (किंमत २० हजार रुपये) असा एकूण २० लाख २० हजार रुपयांचा समावेश आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहेत.

