Deulgaon Raja Municipality : नगरपालिका निवडणुका जाहीर होताच इच्छुकांच्या हालचालींना वेग आला. अनेक माजी नगरसेवक पुन्हा रिंगणात उतरत असले तरी भूतकाळातील कामांची मतदारांकडून होत असलेली काटेकोर चौकशी त्यांना चांगलीच घाम फोडत आहे. केवळ घोषणांनी व वैयक्तिक फायद्याच्या राजकारणाने मतदारांना प्रभावित करता येत नाही, हे चित्र सध्या शहरातील विविध प्रभागात दिसत आहे.

गजानन तिडके
देऊळगाव राजा : नगरपालिका निवडणुका जाहीर होताच इच्छुकांच्या हालचालींना वेग आला. अनेक माजी नगरसेवक पुन्हा रिंगणात उतरत असले तरी भूतकाळातील कामांची मतदारांकडून होत असलेली काटेकोर चौकशी त्यांना चांगलीच घाम फोडत आहे. केवळ घोषणांनी व वैयक्तिक फायद्याच्या राजकारणाने मतदारांना प्रभावित करता येत नाही, हे चित्र सध्या शहरातील विविध प्रभागात दिसत आहे.
35–40 वर्षांच्या परंपरेला ‘राजकीय प्रतिष्ठा’ची जोड
गेल्या अनेक दशकांपासून देऊळगाव राजा नगरपालिकेच्या निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात होत आल्या. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत आमदार मनोज कायंदे यांचा अनपेक्षित विजय आणि दोन दिग्गज — माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे व डॉ. शशिकांत खेडेकर — यांचा पराभव हा शहराच्या राजकारणातील टर्निंग पॉइंट ठरला.शिंगणे यांनी तब्बल अडीच दशक सिंदखेडराजा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले; कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. खेडेकर यांनीही पाच वर्षे मतदारसंघात उल्लेखनीय कामे केली. या दोघांनाही युवा आमदार कायंदे यांनी पराभूत केले होते. त्यामुळे होणारी नगरपरिषद निवडणूक तिघांच्या प्रतिष्ठेची बनली आहे.
तिहेरी लढत… पण खरा मुकाबला अजून धूसर
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपा तसेच मित्र पक्ष दुसरी आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांची नगर विकास आघाडी तर तिसरी आघाडी उबाठा, काँग्रेस आणि मित्र पक्ष अशी तिहेरी लढत सध्या दिसत असली तरी पुढील काही दिवसांत समीकरणे बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
भेटीगाठी, कॉर्नर सभा — प्रचाराला जोर
अध्यक्ष पदासाठी तीन दावेदार असूनही खरी स्पर्धा नगरसेवकांच्या 10 प्रभागात रंगत आहे.
गेल्या काही दिवसांत उमेदवारांच्या भेटीगाठी, कॉर्नर सभा यांना वेग आला आहे. विशेष म्हणजे—
बहुतेक प्रभागांत माजी नगरसेवक पुन्हा मैदानात
भूतकाळातील विकासकामांची मतदारांकडून काटेकोर चौकशी,काहींनी पालिका प्रशासनाच्या आडून प्रमुख चौकातील जागा भाड्याने देत कमाई केल्याचे आरोप त्यामुळे मतदार ‘फक्त घोषणांना’ साथ देण्यासाठी तयार नाहीत, “आम्हीच विकास करू” — मतदारांचा अविश्वास कायम
उमेदवार प्रभागात फिरताना “खऱ्या अर्थाने आम्हीच विकास करू शकतो” असा दावा करतात. मात्र वर्षानुवर्षे प्रभागाचे नेतृत्व केलेले असूनही कामांचा ठोस पुरावा नसल्याने अनेक माजी नगरसेवकांना पराभवाची भीती सतावत आहे.
अनोख्या आघाड्या : भूतो न भविष्यति!
या निवडणुकीत निर्माण झालेली आघाडीची समीकरणे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत—
नगर विकास आघाडी : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) + शिवसेना (शिंदे गट)
द्वितीय आघाडी : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) + भाजपा + मित्र पक्ष
उबाठा पॅनल : उद्ववसेना, काँग्रेस आणि विविध मित्र पक्ष
राज्य पातळीवर एकमेकांच्या विरोधात असलेल्या पक्षांची स्थानिक पातळीवर आघाडी होणे ही विशेष बाब आहे. कोणती आघाडी कितपत प्रभाव पाडणार, कोणाचे जनाधार मजबूत आहे — हे येणारा काळच ठरवेल.

