Money withdrawn : शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा हातचलाखी दाखवत दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची रोकड लंपास केली. प्लॉटचा हप्ता भरण्यासाठी बँकेतून काढलेली ही रक्कम अज्ञात दोन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.४५ ते १ वाजेदरम्यान चिखली रोडवरील राष्ट्रसंत प्लाझासमोर घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आधार अपडेट करायला गेले, इकडे दुचाकीची डिक्की फोडून चोरट्यांनी १.८० लाख पळविले!
गजानन तिडके
देऊळगाव राजा : शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा हातचलाखी दाखवत दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची रोकड लंपास केली. प्लॉटचा हप्ता भरण्यासाठी बँकेतून काढलेली ही रक्कम अज्ञात दोन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.४५ ते १ वाजेदरम्यान चिखली रोडवरील राष्ट्रसंत प्लाझासमोर घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी अरुण साहेबराव शेळके (वय ३३, रा. सावखेड भोई, ता. देऊळगाव राजा) यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण शेळके यांना प्लॉटचा हप्ता भरण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी २३ नोव्हेंबर रोजी देऊळगाव राजा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून १ लाख ८० हजार रुपये काढले. ही संपूर्ण रक्कम त्यांनी केसरी रंगाच्या थैलीत ठेवली आणि ती थैली आपल्या मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवली.
त्यानंतर ते चिखली रोडवरील राष्ट्रसंत प्लाझासमोर रस्त्याच्या बाजूला मोटारसायकल उभी करून आधार कार्ड अपडेट करण्यासाठी जवळच असलेल्या दुकानात गेले. आधार कार्ड अपडेट करून ते काही वेळाने परत मोटारसायकलजवळ आले असता, त्यांना दुचाकीची डिक्की उघडी असल्याचे दिसून आले. त्यांनी डिक्कीत पाहणी केली असता, त्यामध्ये ठेवलेली केसरी रंगाची थैली गायब असल्याचे निदर्शनास आले.
या थैलीमध्ये १ लाख ८० हजार रुपयांच्या रोख रकमेसह स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि एचडीएफसी बँकेची पासबुकदेखील होती. अज्ञात दोन इसमांनी ही रोकड व पासबुक असलेली थैली चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
घटनेनंतर शेळके यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. त्यांच्या तोंडी फिर्यादीवरून पोलिसांनी २३ नोव्हेंबर रोजी रात्री ९.५८ वाजता अज्ञात दोन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गिरी आणि जीपीएसआय मांटे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. भरदिवसा गजबजलेल्या परिसरात दुचाकीच्या डिक्कीतून एवढी मोठी रक्कम चोरीला गेल्याने चोरट्यांनी नेमकी कोणत्या पद्धतीने ही चोरी केली, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

