Modern food street : महिला बचत गट, लघुउद्योजिका आणि पथविक्रेत्यांनी आपल्या खाद्यव्यवसायात अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. ग्राहकांचा विश्वास हीच कोणत्याही व्यवसायाची खरी ताकद असून, सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थांच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून द्यावी, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेशी तडजोड नको! – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
गजानन तिडके
बुलढाणा : महिला बचत गट, लघुउद्योजिका आणि पथविक्रेत्यांनी आपल्या खाद्यव्यवसायात अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. ग्राहकांचा विश्वास हीच कोणत्याही व्यवसायाची खरी ताकद असून, सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थांच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून द्यावी, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) पश्चिम विभागाच्या सहकार्याने शेगाव येथे पथविक्रेते, महिला बचत गट आणि लघुउद्योजिकांसाठी अन्नसुरक्षा प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला FSSAI पश्चिम विभागाच्या प्रादेशिक संचालिका प्रीती चौधरी (IRS), उपसंचालक वैदेही काळझुणकर, सहायक संचालक ज्योती हरणे, तहसीलदार प्रज्ञा काकडे, शेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, FSSAI चे अधिकारी व कर्मचारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, लघुउद्योजिका आणि पथविक्रेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री जाधव म्हणाले की, सेवा सप्ताहाचा उद्देश समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून देणे हा आहे. महिलांना स्वावलंबी बनविणे, छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या व्यवसायाला प्रगतीची दिशा देणे ही लोकसेवेची महत्त्वाची बाजू आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील अनेक महिला बचत गट घरगुती खाद्यपदार्थ, मसाले, लोणची, पापड, मिठाई आदी उत्पादनांच्या माध्यमातून व्यवसाय करीत आहेत. तसेच पथविक्रेते हे स्थानिक खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असून, त्यांच्या व्यवसायातून अनेक कुटुंबांना रोजगार मिळतो. त्यामुळे या व्यावसायिकांना योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.
खाद्यव्यवसायात चवीइतकेच अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितताही महत्त्वाची आहे. स्वच्छ पाण्याचा वापर, अन्नपदार्थ तयार करण्याच्या व साठविण्याच्या योग्य पद्धती, वैयक्तिक स्वच्छता आणि व्यवसाय परिसराची स्वच्छता या बाबींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. ग्राहकांना खाद्यपदार्थ देताना त्यांच्या आरोग्याची आणि विश्वासाची जबाबदारीही व्यावसायिकांनी स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
FSSAI च्या माध्यमातून आयोजित या प्रशिक्षणात अन्नसुरक्षा मानके, सुरक्षित अन्न हाताळणी, वैयक्तिक स्वच्छता, खाद्यपदार्थांची योग्य साठवणूक, व्यवसाय परिसराची स्वच्छता तसेच अन्नसुरक्षा नोंदणी, परवाने आणि नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या विषयासंदर्भात यापूर्वीही दोन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, आजचा हा तिसरा उपक्रम आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांची गुणवत्ता सुधारावी आणि छोट्या अन्नव्यवसायिकांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
शेगाव येथे एक कोटींच्या निधीतून आधुनिक फूड स्ट्रीट
शेगावच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहिती देताना केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या ‘१०० फूड स्ट्रीट्स’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील शेगाव आणि शिर्डी या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी एक कोटी रुपयांच्या निधीतून आधुनिक, स्वच्छ आणि सुरक्षित ‘हेल्दी अँड हायजिनिक फूड स्ट्रीट’ विकसित करण्यास मंजुरी मिळाली आहे.
या उपक्रमामुळे भाविकांना सुरक्षित आणि स्वच्छ खाद्यसुविधा उपलब्ध होण्यासोबतच स्थानिक विक्रेते, महिला उद्योजिका आणि छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायालाही चालना मिळणार आहे. धार्मिक पर्यटनासोबतच स्थानिक रोजगार आणि आर्थिक विकासालाही या उपक्रमाचा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
FSSAI च्या ‘ईट राईट इंडिया’ अभियानाचा उल्लेख करताना त्यांनी सुरक्षित, आरोग्यदायी आणि पौष्टिक अन्नाची निवड करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अन्न केवळ चविष्ट असणे पुरेसे नसून ते स्वच्छ, सुरक्षित आणि पौष्टिक असणे आवश्यक आहे. या अभियानाच्या माध्यमातून अन्नसुरक्षेबाबत जनजागृती करून जबाबदार अन्नपद्धतींचा प्रसार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकास, रोजगार आणि सर्वसामान्यांच्या कल्याणाशी संबंधित विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महिला बचत गटांनी आपल्या उत्पादनांची गुणवत्ता, स्वच्छता आणि पॅकेजिंग सुधारण्यावर भर द्यावा. खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी सुरक्षित अन्न हाताळणीच्या नियमांचे पालन करावे, तसेच आवश्यक नोंदणी व परवाने घ्यावेत. FSSAI च्या अधिकाऱ्यांनीही प्रशिक्षणानंतर या व्यावसायिकांना सातत्याने मार्गदर्शन व सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातील महिला बचत गटांची उत्पादने मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचावीत आणि बुलढाणा जिल्ह्यातील खाद्यव्यवसायिकांची ओळख चव, स्वच्छता व गुणवत्तेसाठी निर्माण व्हावी, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केल्याबद्दल FSSAI पश्चिम विभागाच्या प्रादेशिक संचालिका प्रीती चौधरी (IRS) आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे त्यांनी विशेष आभार मानले. तज्ज्ञ संस्थेचे मार्गदर्शन थेट स्थानिक महिला उद्योजिका आणि पथविक्रेत्यांपर्यंत पोहोचणे ही या उपक्रमाची महत्त्वपूर्ण उपलब्धी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला बचत गट, लघुउद्योजिका आणि पथविक्रेत्यांना अन्नसुरक्षेचे महत्त्व पटवून देत सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी खाद्यव्यवसाय संस्कृती निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला.

