wholesome humanitarian : आर्थिक परिस्थितीमुळे अनेक नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी आणि उपचार घेणे शक्य होत नाही. अशा गरजू व सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मोफत उपलब्ध करून देण्याच्या सामाजिक बांधिलकीतून आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला बाळापूर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी आयोजित या शिबिरात शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील सुमारे ७०० नागरिकांनी सहभागी होऊन मोफत आरोग्यसेवेचा लाभ घेतला.

गरिबांच्या आरोग्यासाठी सेवाभावी हात पुढे; अलवाफी फाउंडेशनच्या महाआरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद
बाळापूर : आर्थिक परिस्थितीमुळे अनेक नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी आणि उपचार घेणे शक्य होत नाही. अशा गरजू व सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मोफत उपलब्ध करून देण्याच्या सामाजिक बांधिलकीतून आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला बाळापूर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी आयोजित या शिबिरात शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील सुमारे ७०० नागरिकांनी सहभागी होऊन मोफत आरोग्यसेवेचा लाभ घेतला.
खामगाव रोडवरील म्हैस नदी पुलाजवळील हजरत काले शाह मियां दरगाह मैदानावर अलवाफी चॅरिटी फाउंडेशन आणि जमीयतुल कुरैश, बाळापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अकोला येथील नामांकित रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली. विविध आजारांबाबत वैद्यकीय सल्ला देण्यासोबतच आवश्यक उपचार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले.
विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा
या महाआरोग्य शिबिरात डॉ. राकेश बजाज (एमबीबीएस, एमएस), जनरल सर्जन, मंज्योत हॉस्पिटल, अकोला; डॉ. मेहविश खान राजा (एमबीबीएस, डीजीओ, एमएस), स्त्रीरोगतज्ज्ञ, सनशाइन हॉस्पिटल, अकोला; डॉ. फैजान अहमद अंसारी (एमबीबीएस, एमडी मेडिसिन, डीएम नेफ्रोलॉजी), मूत्रपिंड विकारतज्ज्ञ, अंसारी हॉस्पिटल, अकोला; डॉ. नवनीत अग्रवाल (एमबीबीएस, एमडी रेडिएशन ऑन्कोलॉजी, डीएम मेडिकल ऑन्कोलॉजी); डॉ. फरहाना अंसारी (एमबीबीएस, एमडी, डीव्हीएल), त्वचारोगतज्ज्ञ, ट्रायकोलॉजिस्ट व कॉस्मेटोलॉजिस्ट, अंसारी हॉस्पिटल, अकोला तसेच डॉ. मोहम्मद शोएब अजीब बंस, अल हयात क्लिनिक अँड हिजामा सेंटर, बाळापूर यांनी रुग्णांची तपासणी करून वैद्यकीय सेवा दिली.
विविध वैद्यकीय क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्टर एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांना आपल्या आरोग्यविषयक समस्या मांडण्याची आणि तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्याची संधी मिळाली. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरले.
आरोग्यसेवेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली
अलवाफी चॅरिटी फाउंडेशनचे चेअरमन हाजी शेख वजीर कुरैशी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा विनामूल्य उपलब्ध करून देणे, वेळेवर आरोग्य तपासणी करण्याचे महत्त्व पटवून देणे आणि समाजात आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
या शिबिराच्या माध्यमातून सुमारे ७०० नागरिकांना मोफत आरोग्यसेवेचा लाभ मिळाला. सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
या आयोजनासाठी अलवाफी चॅरिटी फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी वजीर कुरैशी, मोहम्मद इमरान कुरैशी, मोहम्मद इरफान कुरैशी तसेच जमीयतुल कुरैशच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष पुढाकार घेतला.

