They will live and die together : संसाराच्या वाटेवर सुख-दुःखाचे असंख्य क्षण एकत्र अनुभवले, आयुष्यभर एकमेकांच्या सुख-दुःखात साथ दिली आणि अखेर मृत्यूनेही या सहजीवनाची साथ सोडली नाही… ‘जियेंगे और मरेंगे साथ-साथ’ या भावनेची हृदयस्पर्शी अनुभूती संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा खुर्द येथे पाहायला मिळाली. पतीच्या निधनाचा विरह सहन न झाल्याने अवघ्या १५ तासांच्या अंतराने पत्नीनेही जगाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे, या दांपत्याचा दफनविधीही एकाच ठिकाणी करण्यात आला. आयुष्यभराची सोबत मृत्यूनंतरही कायम राहिल्याच्या या घटनेने संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

जन्मभराची साथ मृत्यूनेही सोडली नाही! खंडेराव दांपत्याचा अवघ्या १५ तासांच्या अंतराने मृत्यू
पातुर्डा बु : संसाराच्या वाटेवर सुख-दुःखाचे असंख्य क्षण एकत्र अनुभवले, आयुष्यभर एकमेकांच्या सुख-दुःखात साथ दिली आणि अखेर मृत्यूनेही या सहजीवनाची साथ सोडली नाही… ‘जियेंगे और मरेंगे साथ-साथ’ या भावनेची हृदयस्पर्शी अनुभूती संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा खुर्द येथे पाहायला मिळाली. पतीच्या निधनाचा विरह सहन न झाल्याने अवघ्या १५ तासांच्या अंतराने पत्नीनेही जगाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे, या दांपत्याचा दफनविधीही एकाच ठिकाणी करण्यात आला. आयुष्यभराची सोबत मृत्यूनंतरही कायम राहिल्याच्या या घटनेने संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
पातुर्डा खुर्द येथील उदेभान आकाराम खंडेराव (वय ७७) यांचे १८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. आयुष्याचा जोडीदार सोडून गेल्याने पत्नी नर्मदा उदेभान खंडेराव (वय ६८) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पतीच्या अखेरच्या प्रवासाची तयारी सुरू असतानाच त्यांच्या विरहाने त्या व्याकूळ झाल्या. पतीच्या जाण्याचा हा मोठा धक्का त्यांना सहन झाला नाही. अखेर दुसऱ्याच दिवशी दुपारी २ वाजता, म्हणजेच अवघ्या १५ तासांच्या अंतराने नर्मदा यांनीही अखेरचा श्वास घेतला.
जन्मभराची सोबत, अखेरच्या प्रवासातही कायम!
खंडेराव दांपत्य कष्टाळू आणि एकमेकांना समजून घेणारे होते. संसाराच्या प्रत्येक वळणावर त्यांनी एकमेकांची साथ दिली. सुखात हसताना आणि संकटात धीर देताना त्यांची सोबत कधीच सुटली नाही. मात्र, नियतीने अवघ्या काही तासांत दोघांनाही हिरावून घेतले. पती-पत्नी दोघांचेही निधन झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
या दांपत्याचा अखेरचा निरोपही तितकाच भावनिक ठरला. दोघांसाठी एकाच ठिकाणी खड्डा तयार करून त्यांचा दफनविधी करण्यात आला. आयुष्यभर हातात हात घालून चाललेल्या या जोडीची अखेरच्या प्रवासातही ताटातूट झाली नाही. पती-पत्नीच्या या अतूट नात्याची आठवण कायम जिवंत राहावी, या भावनेतून त्यांच्या मुलांनी दफनस्थळी वृक्षारोपण केले. आई-वडिलांच्या स्मृतींना जपण्याचा हा भावनिक प्रयत्न उपस्थितांचे मन हेलावून गेला.
मृत्यूनेही तोडली नाही आयुष्यभराची गाठ!
संसारात अनेक नाती निर्माण होतात; मात्र काही नाती काळाच्या पलीकडे जाऊन मनावर कायमची छाप सोडतात. खंडेराव दांपत्याची ही कहाणी त्यापैकीच एक ठरली आहे. अवघ्या १५ तासांच्या अंतराने पती-पत्नी दोघांनीही जगाचा निरोप घेतल्याने पातुर्डा खुर्दसह परिसरात या घटनेची चर्चा होत आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि गावकऱ्यांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
आयुष्यभर एकमेकांची सावली बनून राहिलेल्या या दांपत्याची साथ मृत्यूनेही क्षणभरात संपवली नाही, अशी भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

