Stock of unlicensed seeds : देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे विनापरवाना बियाण्यांचा साठा करून त्यांची विक्री करण्याचा प्रकार कृषी विभागाच्या तपासणीत उघडकीस आला आहे. या कारवाईत भेंडी, मिरची आणि टोमॅटो या भाजीपाला पिकांच्या बियाण्यांचा साठा आढळून आला. या बियाण्यांची एकूण किंमत २ लाख ६० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय बिलामध्ये नमूद असलेली चार लाख रुपये किमतीची मिरची बियाण्यांची पाकिटे प्रत्यक्ष साठ्यात आढळून आली नाहीत. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी संबंधित कंपनीच्या आरोपीविरुद्ध बियाणे अधिनियम व बियाणे नियंत्रण आदेशानुसार गुन्हा दाखल केला आहे.

भेंडी, मिरची, टोमॅटोच्या बियाण्यांची अनधिकृत विक्री; चार लाखांच्या बियाण्यांचा हिशेब गायब!
गजानन तिडके
देऊळगाव राजा : देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे विनापरवाना बियाण्यांचा साठा करून त्यांची विक्री करण्याचा प्रकार कृषी विभागाच्या तपासणीत उघडकीस आला आहे. या कारवाईत भेंडी, मिरची आणि टोमॅटो या भाजीपाला पिकांच्या बियाण्यांचा साठा आढळून आला. या बियाण्यांची एकूण किंमत २ लाख ६० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय बिलामध्ये नमूद असलेली चार लाख रुपये किमतीची मिरची बियाण्यांची पाकिटे प्रत्यक्ष साठ्यात आढळून आली नाहीत. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी संबंधित कंपनीच्या आरोपीविरुद्ध बियाणे अधिनियम व बियाणे नियंत्रण आदेशानुसार गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, २० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास देऊळगाव मही येथील गट क्रमांक १४३/०७/अ येथे असलेल्या जेएसएम सीड्स कंपनीच्या बियाणे साठवणूक व विक्रीच्या ठिकाणी हा प्रकार आढळून आला. सदर कंपनीचे ठिकाण पाडळी शिंदे, पोस्ट सावखेड नागरे, तालुका देऊळगाव राजा असे नमूद आहे.
या प्रकरणी पंचायत समिती देऊळगाव राजा येथील कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) प्रिती रावसाहेब पाटील यांनी पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, संबंधित आरोपी गणेश विठ्ठल शिंदे (रा. चैतन्यवाडी, कन्या शाळेजवळ, बुलढाणा) याच्या ताब्यातील बियाणे विक्री केंद्रावर तपासणीदरम्यान कोणताही वैध परवाना नसताना बियाण्यांचा साठा व विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले.
असा आढळला बियाण्यांचा साठा
तपासणीदरम्यान ५०० ग्रॅम वजनाच्या भेंडी बियाण्यांची १६० सिलबंद पाकिटे, म्हणजेच एकूण ८० किलो बियाणे आढळले. या पाकिटांवर बिलानुसार हस्तलिखित स्वरूपात ‘राधिका’ असे नमूद होते. या बियाण्यांची किंमत ६४ हजार रुपये असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच २०० ग्रॅम वजनाच्या मिरची बियाण्यांची २५ पाकिटे, म्हणजेच एकूण पाच किलो बियाणे आढळले. ही पाकिटे बीजप्रक्रिया केलेली असून त्यावर ‘चिली AK47’ असे हस्तलिखित नाव होते. या बियाण्यांची किंमत एक लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय २०० ग्रॅम वजनाच्या टोमॅटो बियाण्यांची २४ पाकिटे आढळली. या पाकिटांचे एकूण वजन ४ किलो ८०० ग्रॅम असून, कापडी पिशवीच्या आत प्लास्टिक पिशवीत मशीनद्वारे शिवण मारून ती सिलबंद करण्यात आली होती. त्यावर ‘११ टोमॅटो SH’ असे हस्तलिखित नमूद होते. या बियाण्यांची किंमत ९६ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
चार लाखांच्या बियाण्यांचा साठा गायब
या तपासणीदरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली. बिलामध्ये २०० ग्रॅम वजनाच्या मिरचीच्या ५५३१ वाणाच्या ४० पाकिटांची नोंद होती. या पाकिटांचे एकूण वजन २० किलो असून त्यांची किंमत चार लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष घटनास्थळी तपासणी केली असता ही बियाण्यांची पाकिटे आढळून आली नाहीत. त्यामुळे बिलावरील नोंद आणि प्रत्यक्ष उपलब्ध साठा यामध्ये तफावत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी कृषी अधिकारी प्रिती पाटील यांच्या लेखी तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायम अप क्रमांक ५३०/२०२६ नुसार बियाणे अधिनियम १९६६ मधील कलम ६ (ब), ७ (अ), ७ (ब), ७ (क), ७ (ड) व १९ तसेच बियाणे नियंत्रण आदेश १९८३ मधील कलम ३, ७, ८, ९ व १० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२१ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे २ वाजून ५७ मिनिटांनी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
बियाण्यांच्या गुणवत्तेचा आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचा प्रश्न लक्षात घेता, विनापरवाना बियाणे विक्री तसेच बिल आणि प्रत्यक्ष साठ्यातील तफावतीच्या या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

