Manojbhau Kayande : राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या पावन जन्मभूमी असलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजाला राज्याच्या पर्यटन नकाशावर मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी आमदार मनोजभाऊ कायंदे यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. सिंदखेडराजाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करून या परिसराचा सर्वांगीण पर्यटन विकास करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रस्तावित विकासकामांची पाहणी केली.

जिजाऊंच्या जन्मभूमीला पर्यटन वैभव मिळणार! आमदार कायंदे यांच्या पुढाकारातून विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी
गजानन तिडके
सिंदखेडराजा : राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या पावन जन्मभूमी असलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजाला राज्याच्या पर्यटन नकाशावर मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी आमदार मनोजभाऊ कायंदे यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. सिंदखेडराजाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करून या परिसराचा सर्वांगीण पर्यटन विकास करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रस्तावित विकासकामांची पाहणी केली.

या पर्यटन विकासाच्या अनुषंगाने १६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथील मंत्रालयात पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीला सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजभाऊ कायंदे उपस्थित होते. यावेळी सिंदखेडराजा पर्यटन विकास आराखड्यातील विविध प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच प्रस्तावित विकासकामांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सिंदखेडराजाला भेट देऊन उपलब्ध जागा, विद्यमान सुविधा आणि विकासकामांसाठी संभाव्य ठिकाणांची पाहणी करावी, असे निर्देश देण्यात आले होते.

या निर्देशानुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता संजय पाटील, उपअभियंता कल्याण भोसले, कनिष्ठ अभियंता विजय नागरे आणि कनिष्ठ अभियंता योगेश राणे यांनी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे प्रत्यक्ष भेट दिली. या पथकाने पर्यटन विकास आराखड्यात प्रस्तावित असलेल्या विविध कामांच्या ठिकाणांची पाहणी करून उपलब्ध जागा, आवश्यक पायाभूत सुविधा आणि विकासकामांच्या अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर आढावा घेतला.
यावेळी पर्यटनाच्या दृष्टीने कोणती कामे प्राधान्याने हाती घेता येतील, आवश्यक सुविधा कशा विकसित करता येतील आणि ऐतिहासिक स्थळांचे जतन करत पर्यटनाला चालना कशी देता येईल, याबाबत अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. प्रत्यक्ष पाहणीमुळे प्रस्तावित विकासकामांच्या नियोजनाला दिशा मिळण्यास मदत होणार आहे.
या पाहणीप्रसंगी सतीशभाऊ कायंदे, एचडीओ खडसे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी (सीओ), ढोबळे तसेच कनिष्ठ अभियंता अभंग जाधव उपस्थित होते.

जिजाऊंच्या जन्मभूमीला पर्यटनाचे नवे वैभव मिळवून देण्याचा संकल्प
राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मभूमीचा गौरवशाली इतिहास आणि सांस्कृतिक वारसा जगासमोर आणणे, ऐतिहासिक स्थळांचे जतन करणे आणि पर्यटनाच्या माध्यमातून परिसराच्या विकासाला चालना देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. पर्यटन विकासाला गती मिळाल्यास परिसरातील स्थानिक नागरिकांसाठी रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होण्यासही मदत होऊ शकते.

आमदार मनोजभाऊ कायंदे यांनी मंत्रालयीन बैठकीच्या माध्यमातून पर्यटन विभागाकडे मांडलेले प्रस्ताव आणि त्यानंतर पर्यटन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेली प्रत्यक्ष पाहणी यामुळे मातृतीर्थ सिंदखेडराजाच्या पर्यटन विकासाच्या प्रक्रियेला महत्त्वपूर्ण चालना मिळाली आहे.
राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मभूमीला पर्यटनाच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यासाठी आणि सिंदखेडराजाचा ऐतिहासिक वारसा अधिक व्यापक स्वरूपात जतन करण्यासाठी आपला सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू राहील, अशी भूमिका आमदार मनोजभाऊ कायंदे यांनी व्यक्त केली आहे.

