Kartik Mandpotsava : प्रतितिरुपती म्हणून ख्याती असलेल्या देऊळगाव राजा येथील श्री बालाजी महाराजांचा कार्तिक महोत्सव प्रसन्न व मंगलमय वातावरणात सुरू आहे. गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी श्री बालाजी महाराजांचा कार्तिक मंडपोत्सव भक्तिभावात संपन्न झाला.

प्रतितिरुपती देऊळगाव राजात कार्तिक महोत्सवाची धूम; ५ डिसेंबरपर्यंत धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
गजानन तिडके
देऊळगाव राजा : प्रतितिरुपती म्हणून ख्याती असलेल्या देऊळगाव राजा येथील श्री बालाजी महाराजांचा कार्तिक महोत्सव प्रसन्न व मंगलमय वातावरणात सुरू आहे. गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी श्री बालाजी महाराजांचा कार्तिक मंडपोत्सव भक्तिभावात संपन्न झाला.

या प्रसंगी सर्व समाजाचे मानकरी, सेवेकरी, ब्रह्मवृंद, पुजारीवृंद, श्री बालाजी संस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, राणीसाहेब सौ. छायाराजे जाधव, यात्रा समितीचे सदस्य, संस्थानचे व्यवस्थापक व कर्मचारी उपस्थित होते.
सर्वांच्या सहकार्याने आणि दोरांच्या साहाय्याने श्री बालाजी मंदिरापासून गणपती मंदिरापर्यंत १६ कापडी मंडप उभारण्यात आले. दुपारी ३ ते ४.०५ या वेळेत कार्तिक मंडपोत्सवाचा धार्मिक विधी पार पडला. मंडपोत्सवानंतर उपस्थितांनी श्री गणपती व श्री बालाजी महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर धर्माधिकारी यांच्या हस्ते मानकऱ्यांना खोबऱ्याचे वाटप करण्यात आले.
कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात दीपावली पाडवा, दि. १० नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा कार्तिक महोत्सव ५ डिसेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. रविवार, दि. २२ नोव्हेंबरपासून दीपोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या काळात श्री बालाजी महाराजांचा गाभारा विशेष मखराने सजविण्यात येतो. तसेच संस्थानच्या वतीने मंदिरासमोरील स्टीलच्या कठड्यांवर दिव्यांची आकर्षक आरास करून रोषणाई केली जाते.

श्रींच्या दर्शनासाठी येणारे भाविक, विशेषतः महिला, दिव्यांमध्ये तेल घालून ते प्रज्वलित ठेवतात. त्यामुळे मंदिर परिसरातील वातावरण दीपप्रकाशाने उजळून निघते. कार्तिक लळितापर्यंत हा दीपोत्सव सुरू राहणार आहे.
महाद्वाराजवळील मारुतीच्या बैठकीवर मंगळवार, दि. २४ नोव्हेंबरपासून रात्री गोंधळाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. कार्तिक लळितापर्यंत दररोज हा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. यावेळी श्री बालाजी महाराजांसह विविध देवी-देवतांची भावगीते सादर केली जाणार आहेत.
शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी अनुष्ठानाची समाप्ती होणार आहे. घटस्थापनेपासून २१ ब्रह्मवृंदांकडून सुरू असलेल्या यात्रेच्या धार्मिक अनुष्ठानाची सांगता यावेळी होईल. कार्तिक महोत्सवाचा समारोप शनिवार, दि. ५ डिसेंबर रोजी लळित उत्सवाने होणार असून, यानिमित्त काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
अशा प्रकारे विविध धार्मिक विधी, दीपोत्सव, गोंधळ आणि कीर्तनाच्या माध्यमातून श्री बालाजी महाराजांचा कार्तिक महोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. या महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांनी श्री बालाजी फरसावर उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी केले आहे.

