RTO : वाहनांची तपासणी पारदर्शक व्हावी, वाहनधारकांची गैरसोय टळावी आणि चाचणी प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमी व्हावा, या उद्देशाने अकोला आरटीओ कार्यालयात सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्यात आलेले स्वयं-संचालित वाहन चाचणी केंद्र (एटीएस) आता वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. वाहन चाचणीच्या नावाखाली वारंवार वाहने नापास केली जात असल्याने वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. एकाच कारणावरून एकच वाहन चार वेळा नापास झाल्याचा आरोप होत असून, या केंद्रातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अखेर या कथित मनमानीला कंटाळलेल्या वाहनधारकांचा संताप १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उफाळून आला. संतप्त वाहनधारकांनी केंद्रातील कर्मचाऱ्यांना जाब विचारत मारहाण केल्याची घटना घडली.

एकाच वाहनाला चार वेळा फेलचा शिक्का; अकोल्याच्या एटीएस केंद्रात आर्थिक लुटीच्या आरोपांनी खळबळ!
आगाखान पठाण
अकोला : वाहनांची तपासणी पारदर्शक व्हावी, वाहनधारकांची गैरसोय टळावी आणि चाचणी प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमी व्हावा, या उद्देशाने अकोला आरटीओ कार्यालयात सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्यात आलेले स्वयं-संचालित वाहन चाचणी केंद्र (एटीएस) आता वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. वाहन चाचणीच्या नावाखाली वारंवार वाहने नापास केली जात असल्याने वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. एकाच कारणावरून एकच वाहन चार वेळा नापास झाल्याचा आरोप होत असून, या केंद्रातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अखेर या कथित मनमानीला कंटाळलेल्या वाहनधारकांचा संताप १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उफाळून आला. संतप्त वाहनधारकांनी केंद्रातील कर्मचाऱ्यांना जाब विचारत मारहाण केल्याची घटना घडली.
८० टक्के वाहने नापास; हेडलाईटच बनले नापास करण्याचे कारण?
एटीएस केंद्रात गेल्या अडीच महिन्यांपासून तब्बल ८० टक्के वाहने चाचणीत नापास होत असल्याचा आरोप वाहनधारकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, नापास होणाऱ्या बहुतांश वाहनांबाबत हेडलाईटच्या प्रकाशाची तीव्रता किंवा दिशा योग्य नसल्याचे कारण सांगितले जात असल्याची माहिती आहे. मात्र, वाहनधारकांना नेमकी त्रुटी काय आहे, ती कशी दुरुस्त करावी आणि वाहन पुन्हा चाचणीसाठी आणताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत पुरेसे मार्गदर्शन केले जात नसल्याची तक्रार आहे.
काही वाहनधारकांचे वाहन एकाच कारणावरून वारंवार नापास होत असल्याने केंद्रातील चाचणी प्रक्रियेच्या अचूकतेवरच प्रश्न उपस्थित होत आहेत. अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांमुळे वाहनांची तपासणी योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोपही वाहनमालकांकडून केला जात आहे. परिणामी, प्रत्येक वेळी चाचणीसाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागत असल्याने वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागत आहे.
ऑनलाइन चाचणीचा गाजावाजा; निकालासाठी मात्र दीड-दोन तास प्रतीक्षा!
स्वयं-संचालित आणि ऑनलाइन प्रणालीचा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या या केंद्रात वाहन नापास झाल्यानंतर त्याचा निकाल मिळण्यासाठी तब्बल दीड ते दोन तास प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार आहे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्याचे सांगितले जात असताना निकालासाठी एवढा विलंब का होतो, असा सवाल वाहनधारक उपस्थित करीत आहेत.
याबाबत केंद्रातील व्यवस्थापकांना विचारणा केली असता, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राकडून (एनआयसी) डाटा अपलोड करून निकाल पाठविला जात असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, ऑनलाइन व्यवस्थेचा मुख्य उद्देशच वेळेची बचत आणि पारदर्शकता हा असताना निकालासाठी तासन्तास थांबावे लागत असेल, तर या यंत्रणेचा उपयोग काय, असा संतप्त सवाल वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.
खासगीकरण झाले, पण नियंत्रण कुणाचे?
स्वयं-संचालित वाहन चाचणी केंद्राचे कामकाज खासगी यंत्रणेमार्फत चालविले जात असले, तरी त्यावर नियंत्रण आणि देखरेख ठेवण्याची जबाबदारी आरटीओ प्रशासनाची आहे. मात्र, केंद्रातील वारंवारच्या तक्रारींकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहनधारक करीत आहेत.
विशेषतः सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी समीर शेख यांच्या भूमिकेवरही वाहनधारकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. केंद्रातील चाचणी प्रक्रिया, वारंवार वाहनांना नापास करण्याचे प्रकार, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि वाहनधारकांकडून आकारण्यात येणारे अतिरिक्त शुल्क याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाहन पासिंगसाठी ‘रेटकार्ड’ तयार होतेय?
या केंद्रात वाहन पास करून घेण्यासाठी कथितरीत्या वेगवेगळे दर निश्चित केले जात असल्याची चर्चा वाहनधारकांमध्ये रंगू लागली आहे. वाहन पासिंगसाठी रेटकार्ड तयार केले जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाल्याचा दावा केला जात आहे. तसेच एटीएस केंद्राच्या कामकाजात काही अधिकाऱ्यांचा पडद्यामागून हस्तक्षेप असल्याचीही चर्चा आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
वाहनधारकांचा संताप; कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना!
वारंवार वाहन नापास होणे, निकालासाठी तासन्तास प्रतीक्षा, अतिरिक्त चाचणी शुल्क आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव या तक्रारींमुळे वाहनधारकांमध्ये असंतोष वाढत होता. अखेर १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संतप्त वाहनधारकांनी केंद्रातील कर्मचाऱ्यांना जाब विचारत मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेमुळे एटीएस केंद्रातील वातावरण तणावपूर्ण झाले.
वाहनधारकांचा संताप व्यक्त होणे ही परिस्थितीतील गंभीरता दर्शवित असली, तरी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे समर्थनीय नाही. मात्र, अशा घटना घडण्यापूर्वीच तक्रारींचे निराकरण करणे आणि केंद्रातील कारभार पारदर्शक ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
आता आरटीओ प्रशासन कारवाई करणार की तक्रारींकडे कानाडोळा?
वाहनधारकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेले केंद्र त्यांच्याच आर्थिक आणि मानसिक त्रासाचे कारण ठरत असेल, तर या व्यवस्थेचा फेरआढावा घेणे आवश्यक आहे. वाहन नापास होण्याची कारणे स्पष्टपणे देणे, चाचणी प्रक्रियेची तांत्रिक तपासणी करणे, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तपासणे, अतिरिक्त शुल्काच्या आकारणीची चौकशी करणे आणि कथित रेटकार्डच्या चर्चेची सत्यता पडताळणे गरजेचे आहे.
आता या गंभीर तक्रारींची दखल घेऊन आरटीओचे वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी समीर शेख यांची भूमिका काय असते आणि वाहनधारकांना दिलासा मिळतो का, याकडे संपूर्ण अकोला जिल्ह्यातील वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.

