Mahabreaking

[breaking_news]

District Collector :‘मला मोठेपणी कलेक्टर व्हायचंय!’ चिमुकल्याचे स्वप्न ऐकताच जिल्हाधिकाऱ्यांनी खुर्चीवर बसविले; आठ बालकांच्या पुनर्वसनासाठी संवेदनशील पुढाकार!

District Collector : प्रत्येक बालकाला आई-वडिलांचे प्रेम, मायेची ऊब, सुरक्षित घर आणि उज्ज्वल भविष्य मिळावे, हे स्वप्न केवळ शब्दांपुरते न राहता प्रत्यक्षात उतरावे, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी संवेदनशील पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात दत्तकविधान प्रक्रियेत प्रलंबित असलेल्या आठ प्रकरणांचा विशेष आढावा घेऊन त्यांनी या प्रक्रियेला गती दिली. त्यांच्या पुढाकारामुळे आठ बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि हक्काचे कौटुंबिक वातावरण मिळण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.

District Collector

एका खुर्चीने दिले स्वप्नांना बळ, आठ बालकांच्या आयुष्यात फुलणार मायेचे विश्व; जिल्हाधिकाऱ्यांची माणुसकी भावली!

गजानन तिडके

बुलढाणा : प्रत्येक बालकाला आई-वडिलांचे प्रेम, मायेची ऊब, सुरक्षित घर आणि उज्ज्वल भविष्य मिळावे, हे स्वप्न केवळ शब्दांपुरते न राहता प्रत्यक्षात उतरावे, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी संवेदनशील पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात दत्तकविधान प्रक्रियेत प्रलंबित असलेल्या आठ प्रकरणांचा विशेष आढावा घेऊन त्यांनी या प्रक्रियेला गती दिली. त्यांच्या पुढाकारामुळे आठ बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि हक्काचे कौटुंबिक वातावरण मिळण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.

District Collector

प्रशासकीय जबाबदारी सांभाळताना समाजातील सर्वांत संवेदनशील घटक असलेल्या बालकांच्या भविष्याचाही विचार केला पाहिजे, या भावनेतून जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी दत्तकविधानाच्या प्रलंबित प्रकरणांकडे विशेष लक्ष दिले. संबंधित यंत्रणांना आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देत त्यांनी या प्रकरणांचा पाठपुरावा केला. त्यानुसार आठ प्रकरणांतील संबंधित पालकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये संस्थांतर्गत दत्तकविधानाची दोन, सावत्र दत्तकविधानाची दोन आणि नातेवाईकांमार्फत दत्तकविधानाची चार प्रकरणे समाविष्ट आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात आली.

District Collector

‘मला मोठेपणी कलेक्टर व्हायचंय!’ चिमुकल्याच्या स्वप्नाने जिल्हाधिकाऱ्यांचेही मन जिंकले!

या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान घडलेला एक प्रसंग मात्र उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेला. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी संवाद साधताना एका चिमुकल्याला सहज विचारले, ”तुला मोठेपणी काय व्हायचे आहे?” त्यावर त्या निरागस बालकाने क्षणाचाही विलंब न करता आत्मविश्वासाने उत्तर दिले, ”मला मोठेपणी कलेक्टर व्हायचंय!”

एका चिमुकल्याच्या मुखातून उमटलेले हे उत्तर ऐकून जिल्हाधिकाऱ्यांनाही आनंद झाला. त्या बालकाच्या डोळ्यांतील स्वप्न, चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि मनातील जिद्द पाहून डॉ. देवरे यांनी त्याला थेट जिल्हाधिकारी पदाच्या खुर्चीवर बसविले. त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मोठी स्वप्ने पाहा, त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करा आणि एक दिवस ती स्वप्ने नक्की पूर्ण होतील, असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला.

कदाचित त्या चिमुकल्यासाठी हा काही क्षणांचा अनुभव असेल; मात्र आयुष्यभर लक्षात राहील अशी प्रेरणा त्याला या भेटीतून मिळाली. आज ज्याच्या डोळ्यांत कलेक्टर होण्याचे स्वप्न आहे, त्याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची ही केवळ पदाची खुर्ची न राहता स्वप्नपूर्तीच्या प्रवासातील प्रेरणेचे प्रतीक ठरली.

दत्तकविधान म्हणजे केवळ प्रक्रिया नव्हे, तर मायेच्या नात्याची नवी सुरुवात!

दत्तकविधान ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून एखाद्या बालकाला मायेचे छत्र, आपुलकीची माणसे, सुरक्षितता, शिक्षण आणि कुटुंबाचा आधार मिळवून देणारी महत्त्वपूर्ण संधी आहे. प्रत्येक बालकाला प्रेमाने वाढण्याचा, सन्मानाने जगण्याचा आणि स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याचा अधिकार आहे. बालकांच्या आयुष्यातील भावनिक पोकळी भरून काढत त्यांना सुरक्षित कौटुंबिक वातावरण मिळावे, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे.

आठ प्रकरणांतील कार्यवाहीमुळे बालकांच्या कौटुंबिक पुनर्वसनाचा मार्ग सुकर झाला आहे. या प्रयत्नांतून प्रशासनाची संवेदनशीलता आणि बालकांच्या भविष्याप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

या संपूर्ण प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी दिवेश मराठे, संरक्षण अधिकारी सागर राऊत तसेच दत्तकविधान संस्थेचे (दि लव्ह ट्रस्ट) संस्थापक गजानन कुलकर्णी यांनी समन्वय साधत ही कार्यवाही पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top