Chatari Rural Hospital : पातूर तालुक्यातील चतारी ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्यसेवेचा भोंगळ कारभार एका धक्कादायक घटनेमुळे समोर आला आहे. प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेची चक्क १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्याची घटना सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली. रुग्णालयातील डॉक्टरांनी अवघ्या दहा मिनिटांत तपासणी करून प्रसूतीची वेळ आली नसल्याचे कारण देत महिलेला अकोला येथे हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र, रुग्णवाहिका तीन ते चार किलोमीटर अंतरावर पोहोचताच महिलेची प्रसूती झाली. या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

डॉक्टरांनी दहा मिनिटांतच अकोल्याला हलविले; तीन किलोमीटरवर रुग्णवाहिकेत बाळाचा जन्म
राहुल सोनोने
वाडेगाव : पातूर तालुक्यातील चतारी ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्यसेवेचा भोंगळ कारभार एका धक्कादायक घटनेमुळे समोर आला आहे. प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेची चक्क १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्याची घटना सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली. रुग्णालयातील डॉक्टरांनी अवघ्या दहा मिनिटांत तपासणी करून प्रसूतीची वेळ आली नसल्याचे कारण देत महिलेला अकोला येथे हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र, रुग्णवाहिका तीन ते चार किलोमीटर अंतरावर पोहोचताच महिलेची प्रसूती झाली. या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चतारी ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रातील एका गावातील गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी तिच्या नातेवाइकांनी सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी महिलेची तपासणी करण्यात आली. मात्र, प्रसूतीची वेळ अद्याप आलेली नसल्याचे कारण पुढे करून डॉक्टरांनी महिलेला १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून अकोला येथे हलविण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार महिलेला रुग्णवाहिकेतून अकोल्याच्या दिशेने रवाना करण्यात आले. मात्र, रुग्णालयापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर असतानाच महिलेला प्रसूतीकळा तीव्र झाल्या आणि रुग्णवाहिकेतच तिची प्रसूती झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णवाहिका चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला थांबविले. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत महिलेच्या नातेवाइकांनाच प्रसूतीसाठी पुढाकार घ्यावा लागला. सुदैवाने या घटनेत मोठा अनर्थ टळला.
मात्र, प्रसूतीसाठी रुग्णालयात आलेल्या महिलेची योग्य तपासणी करून आवश्यक उपचार करण्यात आले होते का? प्रसूतीची शक्यता असतानाही तिला तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याची गरज होती का? तसेच रुग्णवाहिकेत प्रसूती होण्याची वेळ का आली? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होत आहेत.
वरिष्ठ अधिकारी फिरकेनात; डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
चतारी ग्रामीण रुग्णालयात परिसरातील जवळपास ३५ ते ४० गावांतील रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, अकोला जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर हे रुग्णालय असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या रुग्णालयाकडे पुरेसे लक्ष नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. रुग्णांवर आवश्यक उपचार करण्याऐवजी त्यांना अकोला येथे हलविण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचा आरोपही होत आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी महत्त्वाचे असलेल्या या रुग्णालयात पुरेशा आणि तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध होणे आवश्यक असताना अशा घटना घडत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्हा शल्य चिकित्सकांकडून चौकशीचे आश्वासन
यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, प्रसूतीसाठी आलेल्या महिलेवर चतारी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले होते किंवा नाही, तसेच महिलेची प्रसूती रुग्णवाहिकेतच झाल्याच्या घटनेबाबत रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडून सविस्तर माहिती घेऊन खुलासा मागविण्यात येईल. या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
दरम्यान, या घटनेबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील माहोरे यांच्याशी संपर्क साधला असता, रुग्णालयात महिलेची प्रसूती झाल्याची माहिती देण्यात आली.

