87 farmers : तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पातूर आणि कृषी विज्ञान केंद्र, अकोला यांच्या संयुक्त नियोजनातून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेंतर्गत पातूर तालुक्यातील ८७ शेतकऱ्यांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १६ व १७ नोव्हेंबर २०२६ रोजी कृषी विज्ञान केंद्र, सिसा (उदेगाव), ता. जि. अकोला येथे हा प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

शेतीला दुग्धव्यवसायाची जोड देऊन उत्पन्नवाढीची संधी; ८७ शेतकऱ्यांनी घेतले प्रशिक्षण
राहुल सोनोने
दिग्रस बु. : तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पातूर आणि कृषी विज्ञान केंद्र, अकोला यांच्या संयुक्त नियोजनातून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेंतर्गत पातूर तालुक्यातील ८७ शेतकऱ्यांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १६ व १७ नोव्हेंबर २०२६ रोजी कृषी विज्ञान केंद्र, सिसा (उदेगाव), ता. जि. अकोला येथे हा प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या प्रशिक्षणामध्ये दुग्धव्यवसाय आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती व प्रक्रिया या विषयांवर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. दुग्धव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, जनावरांचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन, दुग्ध उत्पादनात वाढ करण्याचे उपाय, दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती तसेच प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून उत्पन्नवाढीच्या उपलब्ध संधी याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. उमेश ठाकरे, दुग्धव्यवसाय तज्ज्ञ डॉ. गोपाल मंजुळकर, तालुका कृषी अधिकारी विलास वाशिमकर, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक किरण दंदी, आत्मा समितीचे सदस्य अनिकेत खंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पातूर तालुक्यातील पशुपालक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रशिक्षणादरम्यान तज्ज्ञांनी दुग्धव्यवसायाकडे केवळ शेतीपूरक व्यवसाय म्हणून न पाहता एक स्वतंत्र व्यावसायिक उद्योग म्हणून पाहण्याची गरज अधोरेखित केली. जनावरांचे योग्य व्यवस्थापन, दूध उत्पादनाचा दर्जा, दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती आणि त्यावर प्रक्रिया करून बाजारपेठेत विक्री केल्यास शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळू शकतो, असे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी भंडारच बु. येथील प्रगतिशील शेतकरी दीपक इंगळे यांनी प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त करत आपले मनोगत मांडले. अशा प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळत असून, दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर पद्धतीने करण्यासाठी त्याचा निश्चितच उपयोग होईल, असे त्यांनी नमूद केले.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पातूर तसेच मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले. सर्वांच्या उत्कृष्ट नियोजन, समन्वय आणि सहकार्यामुळे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीला पूरक म्हणून दुग्धव्यवसायाची जोड देण्यासह दुग्धजन्य पदार्थांच्या प्रक्रिया उद्योगातून आर्थिक उत्पन्न वाढविण्याची नवी दिशा मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीसोबतच जोडव्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य मिळविण्यास मदत होणार आहे.

