Jaltara : ग्रामीण भागातील जलसंधारणाला चालना देणे, भूजल पातळीत वाढ करणे आणि ग्रामीण कुटुंबांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पंचायत समिती बुलढाणा यांच्या वतीने जलतारा अभियान तसेच विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) या विषयांवर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

आमदार संजय गायकवाड व श्वेताताई महाले यांच्या उपस्थितीत जलतारा, रोजगार मिशनवर मंथन
बबन फेपाळे
रुईखेड मायंबा : ग्रामीण भागातील जलसंधारणाला चालना देणे, भूजल पातळीत वाढ करणे आणि ग्रामीण कुटुंबांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पंचायत समिती बुलढाणा यांच्या वतीने जलतारा अभियान तसेच विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) या विषयांवर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता हतेडी बु. (ता. जि. बुलढाणा) येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात ही कार्यशाळा पार पडणार आहे. या कार्यशाळेला बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयभाऊ गायकवाड आणि चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यशाळेत जलतारा उपक्रमाचे संशोधक पुरुषोत्तम वायाळ हे जलतारा अभियानाची संकल्पना, त्याचे महत्त्व आणि ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या उपक्रमाची उपयुक्तता याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच जलसंधारणाच्या विविध उपाययोजना, पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे, भूजल पातळी वाढविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन यासंदर्भातही माहिती दिली जाणार आहे.
याशिवाय विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अंतर्गत ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी, ग्रामपंचायत स्तरावरील नियोजन आणि रोजगारनिर्मितीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे शेतकरी, ग्रामपंचायत यंत्रणा आणि ग्रामीण विकासाशी संबंधित कर्मचाऱ्यांसाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या कार्यशाळेस तालुक्यातील शेतकरी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी तसेच रोजगार सेवक उपस्थित राहणार आहेत. जलसंधारण आणि ग्रामीण रोजगार या दोन्ही महत्त्वपूर्ण विषयांवर प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार यांनी केले आहे.

