unique reunion : सन १९५९ पासून ज्ञानदानाचे पवित्र कार्य अविरतपणे करणारे श्री जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाडेगाव हे परिसरातील एक प्रतिष्ठित शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते. तालुक्यासह परिसरातील जवळपास ३० ते ४० खेड्यांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत या विद्यालयाने मोलाचे योगदान दिले आहे. अनेक पिढ्यांना शिक्षणाची दिशा देणाऱ्या या विद्यालयात जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी भव्य माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला तब्बल २७०० आजी-माजी विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती लाभली. त्यामुळे विद्यालयाचा संपूर्ण परिसर जुन्या आठवणी, हास्यविनोद आणि स्नेहभावाने गजबजून गेला होता.

जुन्या बाकांवर पुन्हा रंगल्या आठवणी; २७०० माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत जागेश्वर विद्यालयाचा मेळावा उत्साहात
राहुल सोनोने
वाडेगाव : सन १९५९ पासून ज्ञानदानाचे पवित्र कार्य अविरतपणे करणारे श्री जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाडेगाव हे परिसरातील एक प्रतिष्ठित शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते. तालुक्यासह परिसरातील जवळपास ३० ते ४० खेड्यांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत या विद्यालयाने मोलाचे योगदान दिले आहे. अनेक पिढ्यांना शिक्षणाची दिशा देणाऱ्या या विद्यालयात जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी भव्य माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला तब्बल २७०० आजी-माजी विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती लाभली. त्यामुळे विद्यालयाचा संपूर्ण परिसर जुन्या आठवणी, हास्यविनोद आणि स्नेहभावाने गजबजून गेला होता.

विद्यालयाचे प्राचार्य गोपाल मानकर यांच्या अभिनव संकल्पनेतून या भव्य माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अनेक वर्षांनंतर एकाच छताखाली जमलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट, गुरुजनांशी संवाद, सामूहिक छायाचित्रे आणि सेल्फी पॉइंटवर फोटो काढण्याचा आनंद घेत अनेकांनी आपल्या शालेय जीवनातील अविस्मरणीय क्षण पुन्हा अनुभवले.
ज्या वर्गखोल्यांमध्ये बालपण गेले, ज्या बाकांवर बसून ज्ञानाचे धडे गिरवले आणि ज्या शिक्षकांच्या मार्गदर्शनातून आयुष्याला दिशा मिळाली, त्याच विद्यालयाच्या प्रांगणात पुन्हा एकदा एकत्र येण्याचा हा क्षण सर्वांसाठी भावनिक ठरला. आयुष्यात विविध क्षेत्रांत मोठी पदे भूषविणारे, वेगवेगळ्या व्यवसायांत स्थिरावलेले आणि विविध ठिकाणी वास्तव्यास असलेले माजी विद्यार्थी या निमित्ताने एकत्र आले होते. जुन्या आठवणींची उजळणी करताना अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद तरळत होता.
आपण आयुष्यात कितीही मोठे झालो किंवा कितीही दूर गेलो, तरी आपल्या शाळेच्या आठवणी आणि शिक्षकांनी केलेले संस्कार कधीही विसरता कामा नयेत. शाळा आणि गुरुजनांचे ऋण आयुष्यभर जपले पाहिजे, ही भावना या मेळाव्यातून व्यक्त झाली. माजी विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक प्रवासाशी पुन्हा जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम या उपक्रमातून घडले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती येथील धर्मादाय उपायुक्त किशोर मसने होते. प्रमुख अतिथी म्हणून विठ्ठल सरप, माजी शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, निलेश ठोंबरे, शुभम पोरे, निलेश खडसने, गोपाल देशमुखे, गणेश कंडारकर, बाळासाहेब डोंगरे, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष मानकर, उपाध्यक्ष डॉ. वासुदेवराव फाडके, डॉ. हिम्मतरावजी घाटोळ, विश्वनाथजी मानकर आणि विद्यालयाचे प्राचार्य गोपाल मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सन १९५९ पासून सुरू झालेला ज्ञानदानाचा प्रवास आज हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारा ठरला आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने विद्यालय आणि माजी विद्यार्थी यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ झाले. जुन्या आठवणी, गुरुजनांप्रती कृतज्ञता आणि भविष्यातील नव्या प्रेरणेचा संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला. उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गोपाल मानकर यांनी केले. वसंत वकटे आणि सुहास महल्ले यांनी सूत्रसंचालन केले, तर शिवाजीराव म्हैसने यांनी आभार प्रदर्शन केले.
हा भव्य मेळावा यशस्वी करण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व सदस्य, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

