Khorshwar Hill : शहराच्या पश्चिमेस असलेल्या खोरश्वर महादेव मंदिर परिसरातील शासनाच्या मालकीच्या डोंगरावर कथित अवैध गौण खनिज उत्खननाचा प्रकार समोर आल्यानंतर महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिवसरात्र जेसीबीच्या साहाय्याने डोंगर पोखरून मुरूम काढण्यात आल्याचा आरोप असताना महसूल विभागाच्या पंचनाम्यात मात्र उत्खनन करणाऱ्यांची नावेच निष्पन्न झाली नसल्याची बाब आश्चर्यकारक ठरत आहे. विशेष म्हणजे, पंचनाम्यात तब्बल २०० ब्रास मुरूम उत्खनन झाल्याची नोंद असल्याचे सांगितले जात असतानाही संबंधितांवर दंडात्मक कारवाई झाल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळे महसूल विभागाने कारवाई करण्याऐवजी केवळ पंचनाम्याचा सोपस्कार उरकला का, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

दिवसरात्र जेसीबीने डोंगर पोखरला, पंचनाम्यात मात्र उत्खननकर्ते ‘अज्ञात’; २०० ब्रास मुरूम काढल्याची नोंद, दंडात्मक कारवाईला बगल?
गजानन तिडके
देऊळगाव राजा : शहराच्या पश्चिमेस असलेल्या खोरश्वर महादेव मंदिर परिसरातील शासनाच्या मालकीच्या डोंगरावर कथित अवैध गौण खनिज उत्खननाचा प्रकार समोर आल्यानंतर महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिवसरात्र जेसीबीच्या साहाय्याने डोंगर पोखरून मुरूम काढण्यात आल्याचा आरोप असताना महसूल विभागाच्या पंचनाम्यात मात्र उत्खनन करणाऱ्यांची नावेच निष्पन्न झाली नसल्याची बाब आश्चर्यकारक ठरत आहे. विशेष म्हणजे, पंचनाम्यात तब्बल २०० ब्रास मुरूम उत्खनन झाल्याची नोंद असल्याचे सांगितले जात असतानाही संबंधितांवर दंडात्मक कारवाई झाल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळे महसूल विभागाने कारवाई करण्याऐवजी केवळ पंचनाम्याचा सोपस्कार उरकला का, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

तहसीलदारांनी या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात कनिष्ठ महसूल अधिकाऱ्यांच्या स्तरावर कोणती कार्यवाही झाली, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दिवसरात्र जेसीबी चालून डोंगराचे स्वरूप बदलत असताना उत्खनन करणारे नेमके कोण, वाहने कोणाची, मुरूम कुठे वाहून नेण्यात आला आणि या संपूर्ण व्यवहारातून कोणाला फायदा झाला, याचा तपास अद्याप स्पष्टपणे समोर आलेला नाही. त्यामुळे कारवाईच्या नावाखाली केवळ कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून प्रकरण थंड करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.

तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर डोंगर पोखरला!
खोरश्वर पंचानन महादेव मंदिर परिसरात महसूल प्रशासनाच्या अखत्यारीतील ई-क्लास वर्गवारीची सुमारे ११ हेक्टर खडकाळ डोंगराळ जमीन आहे. तहसील कार्यालयापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर आणि शहराबाहेरील वळण रस्त्यालगत हा डोंगर आहे. विशेष म्हणजे, या परिसरात वन विभागाने प्रशासनाची परवानगी घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली आहे. त्यामुळे निसर्गरम्य असलेल्या या डोंगराला धार्मिक आणि पर्यावरणीयदृष्ट्याही महत्त्व आहे.
मात्र, याच डोंगर परिसरातून मोठ्या प्रमाणात मुरूमाचे उत्खनन झाल्याने डोंगराच्या नैसर्गिक स्वरूपाला धक्का बसल्याचे चित्र आहे. महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात सुमारे २०० ब्रास मुरूमाचे उत्खनन झाल्याची नोंद असल्याचे समोर आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्यानंतरही संबंधित उत्खननकर्त्यांची नावे निश्चित करण्यात प्रशासनाला यश आले नसल्याचे चित्र असेल, तर महसूल यंत्रणेच्या तपासाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
२०० ब्रास मुरूम काढला, मग जबाबदार कोण?
शासनाच्या मालकीच्या जमिनीचे संरक्षण करणे, अवैध गौण खनिज उत्खनन रोखणे आणि शासनाचा महसूल सुरक्षित ठेवणे ही महसूल विभागाची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र, तहसील कार्यालयाच्या इतक्या जवळ असलेल्या डोंगरावर उत्खनन होत असताना संबंधित यंत्रणेच्या देखरेखीचा अभाव कसा राहिला, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
उत्खननासाठी कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आली होती का? परवानगी असल्यास किती ब्रास मुरूम काढण्यास मंजुरी होती? प्रत्यक्षात किती मुरूम काढण्यात आला? त्याची रॉयल्टी आणि स्वामित्वधन शासनाकडे जमा झाले का? उत्खनन करणारे जेसीबी, डंपर आणि वाहनमालक कोण आहेत? मुरूम कोणत्या ठिकाणी वापरण्यात आला? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याऐवजी केवळ पंचनामा करून प्रकरण संपविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे.
विशेष म्हणजे, उत्खनन करणाऱ्यांची नावे शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती, वाहनांची ये-जा, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि वाहतूक मार्गांची तपासणी करता येऊ शकते. मग या दिशेने ठोस तपास का झाला नाही, असा सवालही उपस्थित होत आहे.
दोषींना पाठीशी घालणाऱ्यांचीही चौकशी करा!
या प्रकरणात केवळ प्रत्यक्ष उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करून चालणार नाही, तर अवैध उत्खनन सुरू असताना कर्तव्य बजावण्यात कसूर करणाऱ्या किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही भूमिका तपासली पाहिजे. तलाठी, मंडळ अधिकारी आणि संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाहणी केली होती का? उत्खनन रोखण्यासाठी कोणते प्रयत्न केले? वरिष्ठांना माहिती दिली होती का? या सर्व बाबींची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे.
सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या प्रकरणाची वरिष्ठस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. उत्खनन करणाऱ्यांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“देऊळगाव राजा येथील तहसीलदारांना सदर प्रकरणाची चौकशी करून कामात हलगर्जीपणा झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच दिलेले आहेत. यासंदर्भात नेमकी काय कार्यवाही करण्यात आली, याचा अहवाल मागविण्यात येईल. अहवालाच्या आधारे नियमानुसार पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल.”
प्रा. संजय खडसे, उपविभागीय अधिकारी महसूल, सिंदखेड राजा“खोरश्वर महादेव मंदिर परिसरातील शासनाच्या मालकीच्या डोंगरातून मोठ्या प्रमाणात मुरूमाचे उत्खनन करण्यात आले आहे. यामुळे शासनाच्या मालमत्तेचे नुकसान होण्यासोबतच महसुलाचेही नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. या प्रकरणात केवळ पंचनामा करून चालणार नाही. प्रत्यक्ष उत्खनन करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. तसेच या अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि उत्खनन करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांचीही चौकशी करून कारवाई करावी.”
चंद्रकांत खरात, सामाजिक कार्यकर्ते
आता उपविभागीय अधिकाऱ्यांनी अहवाल मागविण्याची भूमिका घेतली असली, तरी प्रत्यक्षात किती मुरूम काढण्यात आला, शासनाचा किती महसूल बुडाला आणि या प्रकरणात कोणाची जबाबदारी निश्चित होते, हे चौकशीतून स्पष्ट होणे अपेक्षित आहे. डोंगर पोखरणारे अज्ञातच राहणार की महसूल प्रशासन त्यांची नावे शोधून कारवाई करणार? हा प्रश्न सध्या देऊळगाव राजा शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.

