Prataprao Jadhav : जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई आणि चारा टंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने केवळ परिस्थिती उद्भवल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी आतापासूनच ठोस नियोजन करून सज्ज राहावे. शेतकरी आणि पशुपालकांना संभाव्य संकटाचा फटका बसू नये, यासाठी चारा लागवड, मुरघास निर्मिती, जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनाची कामे युद्धपातळीवर हाती घ्यावीत. केंद्र पुरस्कृत ‘जी रामजी’ योजनेचा प्रभावी वापर करून शेतकऱ्यांना चारा लागवड व जलसंधारणाच्या कामांतून लाभ मिळवून द्यावा, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रशासनाला दिले.

दुष्काळाच्या सावटात शेतकरी-पशुपालकांना दिलासा देण्यासाठी प्रतापराव जाधव मैदानात; चारा लागवड, जलसंधारणाच्या कामांचा घेतला आढावा
बुलढाणा : जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई आणि चारा टंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने केवळ परिस्थिती उद्भवल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी आतापासूनच ठोस नियोजन करून सज्ज राहावे. शेतकरी आणि पशुपालकांना संभाव्य संकटाचा फटका बसू नये, यासाठी चारा लागवड, मुरघास निर्मिती, जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनाची कामे युद्धपातळीवर हाती घ्यावीत. केंद्र पुरस्कृत ‘जी रामजी’ योजनेचा प्रभावी वापर करून शेतकऱ्यांना चारा लागवड व जलसंधारणाच्या कामांतून लाभ मिळवून द्यावा, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पाणीटंचाई व चारा व्यवस्थापनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, माजी आमदार संजय रायमुलकर यांच्यासह जलसंधारण, मृद व जलसंधारण, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
चारा टंचाई रोखण्यासाठी गावागावांत नियोजन करा!
खरीप हंगामात पावसाची झालेली तूट आणि त्याचा शेती उत्पादनावर झालेला परिणाम लक्षात घेता पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता हा महत्त्वाचा प्रश्न ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने चारा लागवडीसाठी शेतकऱ्यांना वितरित केलेल्या बियाण्यांची प्रत्यक्ष पेरणी झाली की नाही, याची कृषी सहाय्यक आणि तलाठ्यांमार्फत पडताळणी करावी. चारा लागवड झालेल्या क्षेत्राची तालुकानिहाय माहिती आठ दिवसांत सादर करावी. ग्रामस्तरावर चारा लागवडीचे नियोजन करून भविष्यात चारा टंचाई निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जाधव यांनी दिले.
खरीप पिकांची काढणी झाल्यानंतर शेतात शिल्लक राहणारे सोयाबीनचे कुटार, तुरीचे कुटार आणि अन्य पीक अवशेष संकलित करून त्यांचा पशुखाद्य म्हणून वापर करावा. उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत पशुपालकांना मार्गदर्शन करावे. चारा संवर्धन, मुरघास निर्मिती, योग्य साठवणूक आणि पीक अवशेषांचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी प्रशिक्षण व जनजागृती करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चारा छावण्यांची वेळ येण्यापूर्वीच पूर्वतयारी करा!
जिल्ह्यातील पशुधनाची संख्या आणि उपलब्ध चाऱ्याचा साठा यांचा तुलनात्मक विचार करून आगामी काळातील गरज निश्चित करावी. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात ज्वारीसह अन्य चारा पिकांची लागवड करावी. भविष्यात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे संभाव्य परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने आतापासूनच आवश्यक पूर्वतयारी करावी, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांनी दिले.
जलसंधारणाच्या कामांतून पाणीटंचाईवर मात करा!
पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तालुकास्तरावर सर्व विभागांनी समन्वयाने जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत. नद्यांचे खोलीकरण, तलावांतील गाळ काढणे, नाले खोलीकरण, पांदण रस्त्यांची निर्मिती, शेततळ्यांची निर्मिती तसेच माथा ते पायथा जलसंधारणाच्या कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. उपलब्ध शासकीय योजनांचा प्रभावी वापर करून पावसाचे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात अडविणे आणि जमिनीत जिरविण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.
पाणीपुरवठा यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचे निर्देश
जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता सर्व विभागांनी सतर्क राहून नागरिकांमध्ये पाण्याच्या काटकसरीच्या वापराबाबत जनजागृती करावी. जिल्ह्यातील पाणी शुद्धीकरण केंद्रांची स्वच्छता करून ते कार्यान्वित स्थितीत ठेवावेत. पाणीपुरवठा आणि वीजपुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी आवश्यक नियोजन करावे. तसेच इलेक्ट्रिशियनची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा!
दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजना आणि नागरिकांना उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. शेतकरी आणि नागरिकांना शासनाच्या उपाययोजनांची माहिती वेळेत मिळावी, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
संभाव्य पाणी व चारा टंचाईचे संकट लक्षात घेता प्रशासनातील प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी. जलसंधारण, चारा लागवड, पाण्याचा काटकसरीने वापर आणि उपलब्ध संसाधनांचे योग्य व्यवस्थापन या बाबींना सर्वोच्च प्राधान्य देऊन जिल्ह्याला आगामी संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

